आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''राष्ट्रवादीत फूट नाही. कुणीही नाराज नाही आणि अजून कसलाही निर्णय झालाच नाही. कुठलीही बैठक आज झाली नाही. जेव्हाही बैठक होईल तेव्हा मी निमंत्रक या नात्याने स्वतः सांगेल.'' असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिले. यासह शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा आहेत आणि नेहमीच राहील. त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेऊ असेही ते म्हणाले. आज माध्यमांशी पटेल यांनी संवाद साधत अफवांबाबत खुलासा केला.
प्रफुल्ल पटेलांचा खुलासा
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, आज बैठक झाली का बोलवली गेली. टीव्हीवर उलट सुलट बातम्या येत असतात. या सर्वांचा मी अधिकृत खुलासा करू इच्छितो. जर काहीही घडामोडी घडल्या तरी त्या आम्ही अधिकृत पातळीवर त्या सांगू. अजून शरद पवारांनी स्पष्ट काहीही सांगितले नाही. त्यामुळे अफवा नको. शांततेत पवारांना विचार करू द्या. आजचा दिवस जाऊद्या, उद्या आम्ही त्यांना भेटू त्यानंतर अधिकृत आम्ही माध्यमांना सांगू.
विनाकारण अफवा पसरवू नका
प्रफुल्ल पटेल म्हणाले, आमची मिटींगही होत असेल तर आम्ही सांगू. सुप्रिया सुळे अध्यक्ष व्हाव्या असे काहीही नाही. फक्त छगन भुजबळ म्हटले अशी माहीती आहे. ती त्यांच्या व्यक्तिगत भावना आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसची बैठक होईल तेव्हा मीच निमंत्रक राहणार आहे. तेव्हा मीच याबाबत अधिकृत सांगेल. त्यामुळे विनाकारण अफवा पसरवू नये.
भाकरी फिरवण्याचा अर्थ समजला
प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्हाला शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत पूर्वसूचना नव्हती. तो आमच्याबाबत अचानक घडलेला प्रकार आहे. त्यांनी वारंवार सांगितले की, आता बदल हवा. भाकरी फिरवायला हवी असे ते म्हणाले याचा अर्थ पक्षाध्यक्ष बदलण्याची गरज आहे असा त्याचा अर्थ आम्हाला समजला.
आम्हीही पवारांना विनंती करतोय
प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवारांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला आपण त्यांना वेळ द्यायला हवा. कार्यकर्त्यांची भावना आहे की, राजीनामा मागे घ्यावा. आम्हीही आज शरद पवारांशी याच मुद्द्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. राजीनामा मागे घेण्यावर आम्ही त्यांना विनंती केली आहे.
जयंत पाटील नाराज नाहीत
प्रफुल्ल पटेल म्हणाले, जयंत पाटील यांच्याबाबत मी खुलासा करतो की, त्यांचा कुठलाही नाराजीचा सुर नाही. काल स्वतः ते भावनिक होते. काहीही कुणाची नाराजी नाही. आज त्यांच्या कारखान्याची मिटींग होती. म्हणून ते काल पुण्यात गेले होते. मी शरद पवारांच्या घरी स्वच्छेने गेलो. तेही येतील ते नाराज नाही. जे मुंबईत होते ते आले. जयंत पाटील संध्याकाळी मुंबईत आले की, तेही पवारांना भेटतील. शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा आहेत आणि नेहमीच राहील. त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेऊ.
पक्षाध्यक्ष होण्यात रस नाही
प्रफुल्ल पटेल म्हणाले, राजीनामा देऊ नये यासाठी कार्यकर्त्यांसारखाच आमचा प्रयत्न आहे. पण कार्यकर्त्यांनी थोडा धीर ठेवावा. पार्टीचे मी आणि माझ्यासारखे अनेक लोक काम करीत आहेत. अंतीम निर्णयच अजून झालेला नाही त्यामुळे जागा रिक्त होईल का कुणासाठी होईल हे कसे सांगता येईल. मी पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. त्यामुळे मला हे पद महत्वाचेच आहे. त्यामुळे मला अध्यक्षपदात रस नाही. शरद पवारांचा जो फैसला होईल त्यानंतर सविस्तर सांगू.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.