आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना योद्ध्यांचा सत्कार:पडद्यामागील कलाकारांना मदत करणारे प्रशांत दामलेंचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई यांच्यासह 45 कोरोना योद्ध्यांचा केला सत्कार

कोरोनाकाळात आर्थिक संकटात सापडलेल्या पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देणारे अभिनेते प्रशांत दामले यांचा रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात सत्कार करण्यात आला.

निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, नगरसेविका अलका केरकर यांच्यासह समाजाच्या विविध क्षेत्रात कोरोनाकाळात असामान्य कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा या वेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनादी काळापासून आपल्या देशातील लोकांमध्ये समाजसेवेची आवड आहे. जनसेवा ही ईशसेवा मानली गेली आहे. समाजाला देणे ही संस्कृती लोकांच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. त्यामुळे कोरोनाकाळात समाजासाठी काम करण्याची अहमहमिका बघायला मिळाली, असे या वेळी राज्यपालांनी सांगितले. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. समाजातील प्रत्येक घटकाचे कार्य सारखेच महत्त्वाचे असते. कोरोना देशातून लगेचच जाण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे यापुढेही कोरोना योद्ध्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये सेवाकार्य सुरू ठेवावे, असे आवाहन राज्यपालांनी या वेळी केले.

डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉइज, स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य देणारे, गरजू व्यक्तींना व संस्थांना मोफत मास्क, सॅनिटायझर्स, पीपीई किट्स पुरवणाऱ्या दानशूर व्यक्ती अशा ४५ कोरोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला. भाभा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव, परिचारिका दीपाली इंदूलकर, सफाई कर्मचारी उदयकुमारी चरमर, जसलोक रुग्णालय येथील परिचारिका सोनल घुमे, आरोग्यसेविका लतिका नकते, फादर कॉसमॉस एक्का, होली स्पिरिट इस्पितळाच्या कार्यकारी संचालिका स्नेहा जोसेफ, ट्राफिक वॉर्डन अनिता लोबो, वैद्यकीय अधिकारी संजय फुंदे, वॉर्ड अधिकारी सुरेंद्र सिंग, संदीप मुर्जानी व देवयानी वैद्य, जैन संघटनेचे संजय दोषी, रेडिओलॉजिस्ट डॉ. पूजा राजेश छेडा, किशोर मन्याल, महावीर हॉस्पिटलचे प्रकाश कोठारी यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.