आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा इशारा:प्रताप सरनाईक जेलच्या भीतीने चिंताग्रस्त, पण ते जेलचे पाहूणे होणारच; सरनाईकांच्या 'लेटरबॉम्ब'नंतर सोमय्यांचा इशारा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याने राज्यातील राजकारण तापलेले दिसत आहे. राज्यामध्ये काँग्रेसकडून वारंवार स्वबळाचा नारा दिला जात आहे. असे असतानाच आता यामध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बने भर घातली आहे. भाजपसोबत युती करण्याची मागणी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. यामुळे ही राजकारणातील मोठी घडामोड मानली जात आहे. यानंतर किरीट सोमय्यांनी सरनाईकांना इशाराच दिला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेने भाजपसोबत पुन्हा जुळवून घ्यावे असे आवाहन केले आहे. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटत आहे म्हणूने ते असे म्हणत आहेत असे सोमय्या म्हणाले आहेत.

'शिवेसेनाचे आमदार प्रताप सरनाईक "जेल" च्या भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत आणि आता सरनाईकनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा यांच्याशी हातमिळवणी करावी अशी विनवणी केली आहे सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर .... जेलचे पाहुणे होणारच' असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

प्रताप सरनाईकांनी पत्रात काय लिहिले?
आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन पानी पत्रं लिहीले आहे. या पत्राद्वारे त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला. या पत्रात त्यांनी म्हटले की, तुम्ही राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. त्यात काँग्रेस पक्ष स्वबळाची भूमिका घेत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्याच सरकारमधील काही मंत्री केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत असल्याचा आरोपी त्यांनी यात केला.

ते पुढे म्हणतात की, आमचा तुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. कोरोना काळात आपण प्रचंड मेहनत घेऊन कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचा संभाळ केला आहे. त्याबद्दल आपले खरोखर कौतुक करावे तितके कमी आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झालेले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आप्पलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे.

बातम्या आणखी आहेत...