आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Praveen Darekar's Inquiry; Arrests Averted Due To Allegations Of Interrogation Under Pressure From Commissioner Of Police, BJP's Sloganeering| Marathi News

बोगस मजूर प्रकरण:प्रवीण दरेकरांची चौकशी; दोन आठवडे संरक्षण असल्याने अटक टळली, पोलिस आयुक्तांच्या दबावाखाली चौकशीचा आरोप, भाजपची घोषणाबाजी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात विधान परिषद विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांची सोमवारी (४ एप्रिल) मुंबई पोलिसांनी साडेतीन तास चौकशी केली. मात्र मुंबई पोलिस आयुक्तांच्या दबावाखाली ही चौकशी करण्यात आली, असा आरोप दरेकर यांनी केला आहे. दरेकरांची चौकशी सुरू असताना पोलिस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने २९ मार्च रोजी दरेकर यांना दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले असल्याने त्यांची अटक तात्पुरती टळली.दरेकर यांच्या बोगस सदस्यत्व असलेल्या प्रतिज्ञा मजूर संस्थेच्या गेल्या पाच वर्षांतील कामकाजाची चौकशी करण्याचे आदेशही सहकार विभागाने जारी केले आहेत. याप्रकरणी दरेकर यांनी शासनाची फसवणूक केली आहे, असा आरोप करत त्यांच्याविरुद्ध आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई मार्ग, आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या चाैकशीसाठी पोलिसांनी दरेकर यांना शनिवारी (२ एप्रिल) नोटीस बजावली होती.

दरेकर यांची आज साडेतीन तास चौकशी झाली. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर माेठी गर्दी केली होती. दरेकर यांच्या पाठिंब्याच्या घोषणा कार्यकर्ते देत होते. कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागल्याने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीने भाजपसंबंधातील आपली कार्यपद्धती बदलली असून यापुढे त्याचे दृश्य परिणाम दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फडणवीसांना शह : राज्यातील भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू आहे. प्रवीण दरेकर हे फडणवीस यांचे उजवे हात मानले जातात. त्यामुळे दरेकर यांना टार्गेट करत फडणवीस यांना सेनेकडून शह देण्यात येतो आहे.

२ हजार कोटींचा घोटाळा १२ एप्रिलपर्यंत दरेकर यांना अटकेपासून संरक्षण आहे. उच्च न्यायालय काय निर्णय घेते पाहू. दरेकर यांनी २ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. त्यांचा गुन्हा पाहता त्यांना अटक होईलच, असे “आप’चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

नियमबाह्य प्रश्नांचा भडिमार : दरेकरांचा आरोप
तेच तेच प्रश्न विचारून मला भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. साडेतीन तासांत मला बरेच नियमबाह्य प्रश्न विचारले. पोलिसांवर दबाव असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. तपासादरम्यान मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे मॉनिटर करत होते. त्यांचाच दबाव दिसत होता. पोलिसांना कुणाचे तरी फोन येत होते. चार-पाच वेळा पीआय अँटी चेंबरमध्ये गेले आणि नंतर बाहेर आले, असे दरेकर म्हणाले.

दरेकरांची अटक अटळ
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांना गृह विभागाने जशास तसे प्रत्युत्तर द्यावे, अशी मनीषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आहे. त्याविषयी शिवसेनेने गृह विभाग सांभाळणाऱ्या राष्ट्रवादीला मध्यंतरी टोकले होते. दरेकरांच्या आजच्या चौकशीने भाजपला तसा इशाराच दिला गेला.

बातम्या आणखी आहेत...