आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नैतिकतेची कसोटी:धनंजय मुंडेंवर राजीनाम्याचा दबाव, शरद पवार-अजित पवारांशी मुंडेंची चर्चा; आमदारकी धोक्यात?

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार, अजित पवारांशी मुंडेंची चर्चा; मुख्यमंत्री - पवार यांच्यातही चर्चा

लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या बॉलीवूड गायिकेच्या थोरल्या बहिणीशी आपल्या ‘लिव्ह इन रिलेशन’ची जाहीर कबुली देणारे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. मुंडे यांनी अपत्यांची माहिती लपवल्याबद्दल निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली असून नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी भाजपने आग्रह धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुंडेची पाठराखण केली. मुंडे यांचे प्रकरण पेटले असताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थप्रकरणी एनसीबीने रात्री अटक केली. यामुळे महाविकास आघाडी सरकारची मात्र पंचाईत झाली आहे.

मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने दबाव वाढवला आहे. लैंगिक शोषणाचा आरोप पाहता मुंडे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांंनी कोल्हापूर येथे केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहिला असून त्यांच्या मंत्रिपदास कोणताही धोका नसल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

वरिष्ठांना दिली होती कल्पना :

नोव्हेंबर २०२० पासून मुंडे आणि तक्रारदार शर्मा कुटुंबीयांतील संबंध ताणलेले आहेत. मुंडे यांची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्याची धमकी शर्मा कुटुंबीयांकडून देण्यात येत होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या प्रकरणाची कल्पना मुंडे यांनी पक्षातील वरिष्ठांना दिली होती असे समजते. शर्मा बहिणींकडून ब्लॅकमेलिंग थांबवण्यासाठी व या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मुंडे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.

शरद पवार, अजित पवारांशी मुंडेंची चर्चा

या घडामोडीनंतर धनंजय मुंडे यांनी बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. एका बैठकीस उपस्थिती लावली. दुपारी ते मंत्रिमंडळ बैठकीत काही वेळ सहभागी झाले. सायंकाळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. सर्व परिस्थिती मुंडे यांनी पवार यांच्या कानी घातल्याचे समजते.

मुख्यमंत्री - पवार यांच्यातही चर्चा

मुंडेप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातही फोनवर चर्चा झाली. त्यामुळे आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. पवार गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.

आमदारकी धोक्यात?

धनंजय मुंडे यांनी लिव्ह इन संबंधातून झालेल्या अपत्यांची माहिती लपवली आहे. निवडणूक अर्ज भरताना खोटे व दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर दाखल करणे ही गंभीर कायदेशीर चूक आहे. याप्रकरणी कुणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यास त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते, असे मत पुणे येथील वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...