आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या १०० कोटी रुपये वसुलीच्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा देण्यासाठी चहूबाजूने दबाव वाढत आहे. विरोधी पक्ष भाजपने रविवारपासून राज्यभरात आंदोलनाचा धडाका लावला असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जोरदार खलबते सुरू आहेत. रविवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्रीच घेतील असे सांगितले.
रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे नेते तातडीने दिल्लीत पोहोचले. त्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते कमलनाथ आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी सुमारे अडीच तास चर्चा केली. बैठकीचा तपशील कळू शकला नाही. मात्र बैठकीत अनिल देशमुख प्रकरणावर चर्चा झाली नाही असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे.
राजीनामा न घेता खातेबदलाचा पर्याय
देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास पोलिस आयुक्तांचे आरोप सरकारला मान्य असल्याचा समज होईल. सरकारची प्रतिमा मलिन होईल. विरोधक हे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीसुद्धा मागणी करतील. त्यामुळे देशमुख यांच्यासंदर्भात नवा पर्याय पुढे येत आहे. देशमुख यांची गच्छंती न करता खातेबदल करण्यात यावा, असा सूर आघाडी सरकारमध्ये आहे.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही : जयंत पाटील
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर यांनी आरोप केले आहेत. पवारांच्या निवासस्थानी पंढरपूर पोटनिवडणुकीवर चर्चा झाली,असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी रात्री दिल्ली विमानतळावर जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना केला.
1. अनिल देशमुख यांच्या जागी नवे गृहमंत्री म्हणून जलसंपदामंत्री जयंत पाटील किंवा उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना काळात उत्तम काम केलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे गृहमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
2. लेटर बॉम्ब टाकून सरकार व गृहमंत्री यांच्यावर २३ गंभीर आरोप करणारे माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. सिंग सध्या गृहरक्षक दलाचे कमांडंट जनरल आहेत.
वाझेच्या फेरनियुक्तीचा निर्णय परमबीर यांचाच : शरद पवार
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मागच्या आठवड्यात दिल्लीला येऊन गेले. त्यानंतर माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्र्यांवर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचे आरोप केले आहेत. यामागे महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असू शकतो, मात्र त्यात यश येणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. गृहमंत्री देशमुख यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, सोमवारी त्याबाबत निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.