आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम मोदींपर्यंत पोहोचला औरंगाबादचा पाणीप्रश्न:मोदी, ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यपाल म्हणाले- 20-40 वर्षांपासून रखडलेल्या योजना मोदीच पूर्ण करू शकतात!

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये पाच ते सात दिवस पाणी येत नाही. हे काही योग्य नाही. राज्यातील 80 सिंचन योजना 20 वर्षांपेक्षा जास्त काळापासून रखडल्या आहेत. काही योजनांचे 40 वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र, मोदी है, तो मुमकीन है. त्यामुळे त्यांनी या योजना पूर्ण कराव्यात, असे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर महाराष्ट्राच्या समस्यांचा पाढा वाचला. ते राज भवनातील क्रांतिकारी गॅलरीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. राज्यपालांनी वाचलेली प्रश्नांची जंत्री पाहून सारे अवाक झाले. या तक्रारीवरून येणाऱ्या काळात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जातेय.

काय म्हणाले राज्यपाल?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, राज्यातील 80 सिंचन योजना 20 वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरू आहेत. काही योजनांचे 40 वर्षांपासून काम सुरू आहे. त्यातल्या काही योजना या 70 ते 90 टक्के पूर्ण झाल्यात. मात्र, त्यांचा जनतेला लाभ मिळत नाही. राज्यात दोन वर्षांपासून विकास महामंडळाच्या नेमणुका झाल्या नाहीत. मी गरजेनुसार समीक्षा करतो. कारण ते माझ्या अधिकारात येते. औरंगाबादमध्ये पाच दिवस, सात दिवस पाणी येत नाही. हे काही योग्य नाही. अरुण जेटली पूर्वी म्हणालेले, मोदी है, तो मुमकीन है. आता मी सुद्धा म्हणतो, मोदी है, तो मुमकीन है. या योजनाही त्यांनी पूर्ण कराव्यात, असे साकडे त्यांनी पंतप्रधानांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर घातले. त्यामुळे येणाऱ्या काळात यावरून राजकीय वादंग रंगण्याची चिन्हे आहेत.

पंतप्रधान म्हणतात, अस्थी आणल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, लोकमान्य टिळकांनी क्रांतिकारी श्यामजी कृष्ण वर्मांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात ते म्हणाले की, तुमच्याकडे सावरकरांना पाठवले आहे. त्यांच्या राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था करावी. त्यांनी लंडनमधल्या इंडिया हाऊसमध्ये त्यांची व्यवस्था केली. त्या श्यामजी कृष्ण वर्मांचे 1930 मध्ये निधन झाले. मृत्युपूर्वी वर्मा म्हणाले होते, माझ्या मृत्यूनंतर माझ्या अस्थी सांभाळून ठेवाव्यात. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या भारतात नेऊन त्यांचे विसर्जन करावे. हे काम 15 ऑगस्ट 1947 च्या दुसऱ्या दिवशी झाले पाहिजे होते की नाही? ते झाले नाही. मात्र, २००३ मध्ये ७३ वर्षानंतर त्या अस्थी भारतात आणण्याचे सौभाग्य मला मिळाले, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर नाव न घेता टीका केली.

मुख्यमंत्री म्हणाले, ऊर्जादायी ठिकाण

पंतप्रधान पुढे म्हणाले की, एका अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण सारे एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्य समरातील वीरांना ही वास्तू समर्पित करताना मला अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्राचे हे राजभवन गेल्या दशकात अनेक लोकशाही घटनांचा साक्षीदार आहे. हे नवे भवन महाराष्ट्राच्या सर्व जनतेसाठी, राज्यपालांसाठी नवी ऊर्जा देणारे असेल. क्रांतिगाथाशी जोडलेले इतिहासकार विक्रम संपत आणि त्यांच्या सहकार्याचे अभिनंदन करतो.

दिव्यत्वाची जेथे प्रचिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना क्रांतिगाथा या दालनाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणे हा खूप चांगला मुहूर्त. आपण नेहमी काही गोष्टी ऐकत आलो. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती. जे स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहोत, त्यासाठी किती जणांनी आपल्या घरावर निखारे ठेवले. हे घडले नसते, तर आपण इथे येऊ शकलो असतो का? स्वातंत्र्य कोणी आपल्याला आंदण नाही दिले. ते लढून मिळवावे लागले. हा इतिहास जतन करणे आपले काम आहे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

स्वातंत्र्यवीरांचा आदर्श घ्या

मुख्यमंत्री म्हणाले की, पुढे जात असताना पुढच्या पिढीला ज्या गोष्टी द्यायच्या आहेत, त्या नाही दिल्या तर आपण कर्तृत्वाला मुकतो आहोत. ज्यांनी-ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला त्या क्रांतिकारकांचे संकलन व्हावे. म्हणून नुसते बोलत बसण्यापेक्षा ज्यांनी आपल्यासाठी त्याग केला, त्यापैकी एकही कण आपण केला, तर तो त्याग आणि बलिदान कृतार्थ होईल. काळ बदल असला तरी इतिहासातल्या वास्तूंचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करणे खूप मोठे काम असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

बातम्या आणखी आहेत...