आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची खात्रीलायक माहिती पक्षातील सूत्रांनी “दिव्य मराठी’ला दिली. चार दिवसांत विद्यमान अध्यक्ष नाना पटाेले यांच्या नावाची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली जाणार आहे.
महाराष्ट्रात प्रभारी म्हणून बंगळुरूचे एच. के. पाटील यांची चार महिन्यांपूर्वी नियुक्ती झाली. त्यांनी पक्षपातळीवर संघटनात्मक बदल हाती घेतले. त्याचा भाग म्हणून मुंबई अध्यक्ष बदलण्यात आले. महिला प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले. आता प्रदेशाध्यक्षपद बदलण्यात येत आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची वर्णी लागणार हे निश्चित आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी उरकल्यानंतर महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पवार-फडणवीस यांनी २४ तासांत अन् आवाजी मतदानाने सरकारचे बळ दाखवावे असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परिणामी, फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा दिला होता. न्यायालयातील लढाईचे नेतृत्व तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी केले हाेते. मात्र सरकारमध्ये चव्हाण यांनी मंत्रिपद नाकारले होते. त्यामुळे चव्हाण यांचे पुनर्वसन पक्षाला करायचे होते. प्रारंभी राष्ट्रवादीचा चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्यास विरोध होता, पण आता राज्यातील स्थिती बदलली आहे. तसेच पटोले हे कुणबी असून ते विदर्भातील आहेत. त्यामुळे काँग्रेसला विधानसभा अध्यक्ष मराठा आणि तो पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील हवा असल्याचे सांगण्यात येते.
पारंपरिक घराणे टिकवण्याकडे काँग्रेसचा कल
विधानसभेत महाविकास आघाडीचे १७० चे संख्याबळ आहे. विधानसभा उपाध्यक्ष महाविकास आघाडीकडेच आहेत. त्यामुळे आवाजी मतदान घेऊन नवा विधानसभा अध्यक्ष निवडीत सरकारला कोणताही धोका नाही. तसेच काँग्रेसमध्ये इतर पक्षातून आलेले काँग्रेसचे नेते मध्यंतरी भाजपच्या गळाला लागले. पण काँग्रेसची अनेक पारंपरिक घराणी अजूनही पक्षाची पाठीराखी आहेत. त्यामुळे आपली पारंपरिक घराणी टिकवण्याकडे पक्षश्रेष्ठींचा कल राजस्थानातील सचिन पायलट प्रकरणानंतर बनला असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.