आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाकरे गटाच्या राज्यसभेतल्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आज गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्याकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार करत त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.
ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेली मारहाण आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली दंगल या पार्श्वभूमीवर चतुर्वेदी यांनी ही भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.
कारवाई करावी
महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री दंगल झाली. त्यानंतर ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण झाली. यावरून ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजपमध्ये जुंपली आहे. त्याची धग बुधवारी दिल्लीपर्यंत पोहचली. हा विषय प्रियांका चतुर्वेदी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडला. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबद्दल अहवाल मागावा, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्राचे संस्कार, संस्कृती कधीही महिलांसोबत मारहाणीचे प्रकार सहन करणार नाहीत. या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हा कोणता कायदा?
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, महाराष्ट्राचे गृहमंत्री अपयशी ठरलेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयानेही फटकारले. संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीत कशी हिंसा झाली ते सर्वांनी पाहिले. आता ठाण्यात रोशनी शिंदेंना मारहाण झाली. हा गुन्हा दाखल न करता आता पोलिसच पीडितेच्या मागे लागलेत. हा कोणता कायदा आणि न्याय आहे, असा सवाल त्यांनी केला. दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन अमित शहा यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली.
फडणवीसांना हटवावे
प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे. ते प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. ते गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेत. त्यांना पदावरून हटवण्याची गरज आहे. पोलिसांनी त्यांचे काम करावे. राजकीय दबाव झुगारून काम करावे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
गर्भवती महिलेला मारहाण
प्रियांका चतुर्वेदी पुढे म्हणाल्या की, सहा महिन्यांच्या गर्भवतीला मारहाण झाली. राजकीय मतभेद म्हणून असे करणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. महिलेसाठी आई होणे सर्वात महत्त्वाचे असते. महिलांचा असा अपमान करायला महाराष्ट्राची संस्कृती शिकवत नाही. आम्ही ते सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
संबंधित वृत्तः
छत्रपती संभाजीनगर दंगल:गोळीबारात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू; 8 आरोपींना 3 एप्रिलपर्यंत कोठडी
छत्रपती संभाजीनगर दंगलीमागील राजकारण:नामांतरावरून महिनाभर राजकारण तापवले; अखेर दंगल
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.