आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ठिणगी:राज्यसभेत ‘जय भवानी, जय शिवाजी’ची घोषणा वादात; राज्यात वाद पेटला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान; भाजप, भिडेंचे तोंड बंद का : शिवसेना

राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणा दिल्याबद्दल राज्यसभेत समज दिली. या घटनेचे राजकीय पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. शिवसेनेने या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचा दिल्ली दरबारी अपमान होत असताना भाजप व संभाजी भिडे यांची तोंडं अद्याप बंद का, असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसं काही घडलंच नाही, अन्यथा सभागृहातच राजीनामा दिला असता, असे प्रत्युत्तर स्वत: उदयनराजे यांनी दिले आहे.

राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात कोणत्याही घोषणा करायच्या नसतात. तुमचे हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्यात येत आहे. यापुढे अशी विधाने सभागृहात करू नका, अशी समज उदयनराजे यांना दिली. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला घेरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? असा टाेला राऊत यांनी लगावला.

उदयनराजेंच्या पाठीशी : शिवप्रतिष्ठान

राऊत यांनी भाजपवर टीका करतानाच शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनाही या प्रकरणात धारेवर धरले आहे, तर लॉकडाऊनमुळे सांगली, सातारा आधीच बंद आहे हे राऊत यांना माहीतही नाही का, असा सवाल करत शिव प्रतिष्ठानने देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायला कुणाच्या परवानगीची गरज नाही, असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही आम्ही उदयनराजेंसाठी आंदोलने केली आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी कायम आहोत, असेही प्रतिष्ठानने म्हटले आहे.

सभागृहातच राजीनामा दिला असता : उदयनराजे

राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झालाच नाही. सभागृहात असे काही घडलेच नाही, असे सांगतानाच महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच खासदारकीचा राजीनामा दिला असता, असे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका, जे घडले नाही त्याचा बाऊ करू नका, असे आवाहनही त्यांनी साताऱ्यात घेतलेल्या पत्रपरिषदेत केले. मी शपथ घेतल्यावर घोषणा दिल्या. त्याला काँग्रेसच्या सदस्याने आक्षेप घेतला. त्यावर अध्यक्षांनी हे कुणाचं घर नाही. हे चेंबर असून त्याचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे तुमचं म्हणणं रेकॉर्डवर येणार नाही. यापुढे या गोष्टींचं भान ठेवा, असे नायडू यांनी सांगितले. त्यांनी जे सांगितलं ते राज्यघटनेला धरून होतं. त्यात काही चुकीचं नाही. अवमान होण्यासारखेही काही नाही. उलट त्यांनी मला नव्हे, तर माझ्या घोषणेला आक्षेप घेणाऱ्याला नायडूंनी रोखले, असा दावा खासदार उदयनराजे भाेसले यांनी केलेा केला.

शिवरायांचे नाव घेऊन औरंगजेबासारखे राज्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाहीत. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा‌ अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनरुज्जीवित केला जात आहे. शिवरायांचा आशीर्वाद असल्याचं सांगत सत्तेवर आलेला भाजप औरंगजेबासारखे राज्य चालवत आहे, अशी टीका करत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते सचिन सावंत यांनी यांनी भाजपचा निषेध केला.

राष्ट्रवादीचे अभिनव आंदोलन

उदयनराजेंच्या अपमानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने अभिनव आंदोलन हाती घेतले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे लिहिलेली २० लाख पत्रे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. उदयनराजे यांच्या घाेषणेला व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला हाेता त्याचा निषेध म्हणून ही पत्रे पाठवली जाणार आहेत.

खासदार संजय राऊत यांनी विराेधकांना घेरले

महाराजांच्या नावावर राजकारण नको : जयंत पाटील : या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाष्य केले आहे. उदयनराजे यांचे म्हणणे बरोबर आहे. कुणीही शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण याेग्य नाही असे त्यांनी म्हटलं आहे.