आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदोन्नतीतील आरक्षणावर राऊत आक्रमक:काँग्रेसमध्ये मात्र दुमत, अनेक नेत्यांचे मौन; मराठा समाज दुखावू नये हे राष्ट्रवादी, शिवसेनेचे धोरण - उर्जामंत्री

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षणाचा 33 टक्के लाभ मिळणार हाेता.

पदोन्नतीतील आरक्षण राहिलेच पाहिजे, या प्रश्नी काँग्रेस पक्ष आक्रमक असला तरी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना काँग्रेसमधून पाठिंबा नसल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे मराठा नेते पदोन्नतीतील आरक्षणाच्या भूमिकेवर मौन बाळगून आहेत. परिणामी, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात बदल होण्याची शक्यता नसल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून समजते. मराठा आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षण हे मुद्दे राज्यात संवेदनशील अाहेत. ५ मे रोजी मराठा आरक्षण खटल्यात सुप्रीम कोर्टाने विरोधात निकाल दिल्यानंतर ती कसर भरून काढण्यासाठी राज्य शासनाने ७ मे रोजी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जीआर काढला. त्यानंतर काँग्रेस नेते व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आक्रमक झाले आहेत.

राऊत हे काँग्रेसच्या अनुसूचित जाती राष्ट्रीय सेलचे अध्यक्ष असून ते विदर्भातील काँग्रेसचा दलित चेहरा आहेत. राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदोन्नती आरक्षणाच्या भूमिकेवर सोबत घेतले आहे. पटोले ओबीसी असून इतर मागास प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश नको, अशी त्यांची भूमिका सर्वश्रुत आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवण्यात अपयश आल्याबाबत चव्हाण टिकेचे धनी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसमधले मराठा नेते पदोन्नतीतील आरक्षणप्रश्नी मौन बाळगून आहेत.

राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षणाचा ३३ टक्के लाभ मिळणार हाेता. गेली चार वर्षे या आरक्षणाचा प्रश्न रखडल्याने ६० हजार कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत. २० एप्रिल रोजी आघाडी सरकारने न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून ३३ टक्के जागा वगळता खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. मात्र ५ मे रोजी मराठा आरक्षण खटल्यात पराभव होताच, मुंबई उच्च न्यायालयाच्या ४ एप्रिल २०१७ च्या आदेशाचा बडगा दाखवत सर्व १०० टक्के पदे सेवाज्येष्ठनेतुसार भरण्याचा ७ मे रोजी शासन निर्णय जारी केला.

काँग्रेसचा मुख्य जनाधार
मराठा समाज आजही काँग्रेस पक्षाचा सर्वात मोठा जनाधार आहे. म्हणून पदोन्नती आरक्षणप्रश्नी काँग्रेस नेते आक्रमक भूमिका घेत नाहीत, असेच चित्र सध्या दिसत आहे.

शिवसेनेची मूकसंमती
राष्ट्रवादीने पदोन्नती आरक्षणाचा निर्णय जाणीवपूर्वक फिरवल्याचे सांगण्यात येते. यामागे दुखावलेल्या मराठा समाजाला खुश करण्याचा प्रयत्न आहे. शिवसेनेची याला मूकसंमती आहे.

बातम्या आणखी आहेत...