आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Promotion Reservation Updates: Nitin Raut Barred From Cabinet Meeting; Disgruntled Congress Leaders Complain To Chief Minister Thackeray; News And Live Updates

पदोन्नतीतील आरक्षण:नितीन राऊत यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोखले; नाराज काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे कैफियत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • योग्य तोडगा काढू : मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याने सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष नाराज आहे. काँग्रेस नेते व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हा विषय गुरुवारच्या मंत्रिंमडळ बैठकीत मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना रोखण्यात आले तसेच हा विषय मंत्रिमंडळ उपसमितीत मांडण्यास बजावण्यात आले. त्यामुळे नाराज मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटून कैफियत मांडली. पदोन्नतीच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळ बैठकीत गुरुवारी कोणताही निर्णय झाला नाही. येत्या मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत याबाबत बैठक होणार आहे.

या बैठकीत चर्चा करून निर्णय होईल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पत्रकारांना सांगतिले. पदोन्नतीतील आरक्षण विषयावर आता समन्वय समितीत चर्चा होणार असल्याचे समजते. महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाच्या विषयांवर समन्वय समितीत चर्चा होते. तिन्ही पक्षांतील प्रमुख मंत्री या समितीत आहेत. या समितीत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, शिवसेनेकडून सुभाष देसाई, अनिल परब आदी मंत्री आहेत.

गुरुवारी सकाळी नितीन राऊत, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक झाली. त्यात मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय लावून धरण्याचा निर्णय झाला. ठरलेल्या रणनीतीनुसार कॅबिनेट बैठक आटोपताच नितीन राऊत यांनी पदोन्नती आरक्षणाचा विषय मांडण्याचा प्रारंभ केला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा विषय मंत्रिमंडळ उपसमितीत मांडण्यास बजावले. त्यावर काँग्रेसचे मंत्री काही बोलू शकले नाहीत.

योग्य तोडगा काढू : मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
बैठकीनंतर काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यात नितीन राऊत, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर यांचा समावेश होता. पदोन्नती आरक्षण विषयावर योग्य तोडगा काढला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...