आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद:कोविड योद्ध्यांना संरक्षण द्या, सर्वपक्षीय आमदारांची विनंती; शोकप्रस्तावाचा संकेत सारून कोविड योद्ध्यांच्या मागण्या

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड योद्ध्यांसाठी या केल्या मागण्या

कोरोना साथीच्या वातावरणात सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात कोविडचे पडसाद उमटले. शोकप्रस्तावाच्या चर्चेत मागण्या न मांडण्याच्या संकेतास बाजूला सारून सर्वपक्षीय सदस्यांनी कोविड योद्ध्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाच्या मागण्या केल्या.

पुरवणी मागण्या आणि सरकारी विधेयकांचे कामकाज संपल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत शोकप्रस्ताव मांडला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव निलंगेकर, माजी आमदार रामनाथ मोते, बलभीमराव देशमुख, युनूस शेख, जयवंतराव ठाकरे यांना श्रद्धांजली वाहतानाच सर्व सदस्यांनी कोविडमुळे दगावलेल्या रुग्णांसह या काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेले डॉक्टर्स, पोलिस, स्वयंसेवक, आशा वर्कर्स आणि पत्रकार यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. कोविड साथीच्या काळात कर्तव्य बजावताना बळी गेलेल्या कोविड योद्ध्यांना शहिदाचा दर्जा द्यावा अशी विनंती परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य शासनास केली. कोविडमुळे दगावलेले पत्रकार पांडुरंग रायकर यांचे उदाहरण देत पत्रकारांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. कर्तव्य बजावताना संसर्गित झाल्याने मृत्युमुखी पडलेल्या कोविड योद्ध्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्याची विनंती त्यांनी या वेळी केली. गरीब वस्त्यांमध्ये उपचार देत असताना संसर्गित झालेल्या डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर्स यांच्या उपचाराचा खर्च शासनाने करण्याची मागणी काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केली.

कोविड योद्ध्यांसाठी या केल्या मागण्या

> दगावलेले डॉक्टर्स, पोलिस, नर्सेस यांना शहिदाचा दर्जा मिळावा

> पत्रकारांना ५० लाखांचे विमा संरक्षण मिळावे

> कर्तव्य बजावताना बळी पडलेल्यांच्या वारसांना शासकीय सेवेत घ्यावे

> वस्त्यांमध्ये उपचार करताना संसर्गित झालेल्या डॉक्टरांना उपचार खर्च मिळावा

शोकप्रस्तावातही कोपरखळ्या

राजकीय टिप्पणी न करण्याचा संकेतही परिषदेतील आमदारांनी या वेळी गुंडाळला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहताना भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाव न घेता राहुल गांधींना टोला लगावला. जीएसटीचे सूतोवाच मुखर्जींनी केले, मात्र त्याच पक्षाच्या नेत्यांना जीएसटीमुळे जीडीपी घसरल्याचा शोध लागल्याची टीका दरेकरांनी केली. सध्याची काँग्रेस ही मूळ काँग्रेस नसून फाटाफुटीनंतरची इंदिरा काँग्रेस असल्याची टीका शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. यावर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी प्रणवदांच्या पुस्तकांचे दाखले देत दोन्ही विधाने खोडून काढली.

माजी राष्ट्रपती प्रणवदांच्या आठवणींना उजाळा

या वेळी श्रद्धांजली वाहणाऱ्या सदस्यांनी प्रणवदांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. प्रणवदांच्या संकटमोचकाच्या भूमिकेमुळेच निलंगेकरांना मुख्यमंत्रिपद, तर वसंतदादांना राजस्थानचे राज्यपालपद कसे मिळाले हा किस्सा काँग्रेसचे आमदार रणपिसे यांनी सांगितला. काँग्रेस आणि इंटक यांच्यात फूट पडली असताना प्रणवदांच्या एका वाक्याने तो पेच कसा सुटला ही आठवण भाई जगतापांनी सांगितली. त्यांच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडीत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असल्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री पवार यांनी केला. प्रणवदा सक्षम प्रशासक आणि मुत्सद्दी राजकारणी कसे होते याचे स्मरण करून देत सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.