आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत गदारोळ:स्थगन प्रस्ताव फेटाळताच विरोधक वेलमध्ये, सभात्याग

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पावसाने झालेले पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि घसरलेल्या कांदा दरावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत गुरुवारी स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळला. त्यावर विरोधी आमदारांनी वेलमध्ये उतरून गोंधळ घातला. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गदारोळ घालणाऱ्या आमदारांना खडसावत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभे आहे, असे सांगून अवकाळी पाऊस गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर विरोधकांनी आक्षेप घेतला. वेलमध्ये धाव घेत गदारोळ घालण्यास सुरवात केली. अध्यक्षांनी त्याही परिस्थितीत सभागृहाचे काम सुरू ठेवले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

नाना पटोले यांनी राज्यात शेतकरी आत्महत्या करत असून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप केला. मात्र, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांना अधिक बोलण्याची संधी नाकारत प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी वेलमध्ये धाव घेतली. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या जीवावर हे सरकार चालेल आहे. लाखाचा पोशिंदा संपतो आहे. शेतकऱ्यांना दिलासा देईल असे वाटले होते. मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई जाहीर करायला हवी होती, मात्र ती केलीच नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसतील तर काय उपयोग ? निव्वळ प्रश्नोत्तरे घेऊन प्रश्न संपणार आहेत, का असा सवाल पवार यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना उलट सवाल : अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, अजितदादा तुमच्या सरकारमध्ये मी मंत्री होतो. त्या सरकारने शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली. पण दिली का? आमच्या सरकारने शेतकऱ्यांना जितका निधी दिला तेवढा निधी कोणत्या सरकारने दिला नाही. अवकाळी पावसाने नुकसान झाले हे मान्य आहे. पण, नुकसानीचे पंचनामे करावे लागतात. किती नुकसान झाले याचा आढावा घेतला जातो व मदत देतात, हे तुम्हाला माहीत नाही का , असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...