आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण:मंत्री संजय राठाेड यांच्या राजीनाम्याच्या दिवसभर वावड्या, शिवसेेनेकडून इन्कार

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वनमंत्र्यांना तूर्तास अभय!

बीडची टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांना शिवसेनेकडून तूर्तास अभय मिळाल्याचे दिसत आहे. मंगळवारी सकाळपासूनच माध्यमांमध्ये राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसारित केले जात होते. परंतु राठोड यांचा राजीनामा घेण्याचा शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोणताही विचार नाही, असे शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

भाजप युवती आघाडीची सक्रिय कार्यकर्ती असलेल्या पूजा चव्हाण हिने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील घरात आत्महत्या केली होती. याप्रकरणी मंगळवारी पुणे पोलिसांनी आपला प्राथमिक तपास अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाला पाठवला आहे. तत्पूर्वी, वनमंत्री राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याचे वृत्त इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दिले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, राजीनाम्याचे वृत्त चुकीचे असून मुख्यमंत्रीच याप्रकरणी माहिती देतील, असे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. दुपारी वर्षा निवासस्थानी शिवसेना आमदार, खासदार व जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. त्या बैठकीत राठोड यांच्या राजीनाम्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुठलेही संकेत दिले नसल्याचे बैठकीतील सहभागींनी सांगितले.

कुटुंबीयांची तक्रार नसल्याने शिवसेना निश्चिंत
आत्महत्या केलेली तरुणी आणि याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले संजय राठोड हे दोघे बंजारा समाजाचे आहेत. याप्रकरणी भाजपने सर्वत्र रान उठवले असले तरी कोपर्डीसारखे सामाजिक आंदोलन काही उभे राहणार नाही, याविषयी शिवसेना नेतृत्व निश्चिंत आहे. तसेच पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची तक्रार नाही. त्यामुळे या प्रकरणाला फाटे फुटलेले नाहीत.

...म्हणून राठोड यांचे मंत्रिपद शाबूत
पूजा चव्हाणप्रकरणी अद्याप गुन्हाही दाखल झालेला नाही. ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजा आणि तिचा मित्र अरुण राठोड यांचे नाहीत,असे दावे दोघांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले आहेत. नुसत्या संशयाचा धुरळ्यावरून संजय राठोड यांचा राजीनामा घेणे म्हणजे विरोधकांसमोर नमते घेणे, शिवाय संजय राठोड हे विदर्भातील शिवसेनेचा चेहरा आहेत. त्यामुळेच चौकशीनंतर निर्णय घेऊ,असे शिवसेनेसह आघाडी सरकारमधील मंत्री सांगत आहेत.

राठोड यांच्याविरोधात मीडिया ट्रायल : वडेट्टीवार
शिवसेनेच्या एकाही नेत्याने राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र, यात तथ्य असेल तर हा मीडिया ट्रायलचा परिणाम आहे, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. महिलांबाबत भाजप नेत्यांची डझनावारी प्रकरणे मला सांगता येतील. पण, त्यांना नैतिकता लागू होत नाही. तिथे नैतिकता संपुष्टात येते, असे वडेट्टीवार म्हणाले.