आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Pune Teacher And Graduate Constituency Election 2020 : BJP Vs Mahavikas Aghadi Face To Face, BJP Announces Candidates In 4 Constituencies; Possibility Of Mutiny In Marathwada

कोरोनाकाळातील पहिलीच निवडणूक:भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना, भाजपची 4 मतदारसंघांत उमेदवारांची घोषणा; मराठवाड्यात बंडखोरीची शक्यता

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाविकास आघाडीतील जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही

विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून कोरोनाकाळात होणाऱ्या या पहिल्यावहिल्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. भाजपने सोमवारी तीन पदवीधर आणि एक शिक्षक मतदारसंघ अशा एकूण ४ जागांसाठी उमेदवार जाहीर केले. महाविकास आघाडीतील जागावाटपावर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी रात्री होणाऱ्या बैठकीत ताेडगा निघणार आहे. आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच राज्यपातळीवरील निवडणुकीत प्रथमच भाजप आणि आघाडी यांचा सामना होणार आहे.

भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या ४ उमेदवारांची सोमवारी घोषणा केली. पुणे पदवीधरसाठी सांगलीचे संग्राम देशमुख, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडे यांना उमेदवारी दिली. नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक विद्यमान आमदार अनिल सोले यांचे तिकीट कापून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस समर्थक महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पदवीधर मतदारसंघासाठी औरंगाबादचे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने मराठवाड्यात भाजपमध्ये बंडखोरी अटळ असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी पंकजा मुंडे समर्थक भाजपचे माजी बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. पुणे शिक्षकमधून अद्याप भाजपने उमेदवारी जाहीर केलेली नाही. औरंगाबाद आणि पुणे पदवीधर राष्ट्रवादी लढवणार आहे. नागपूर पदवीधर काँग्रेस तर अमरावती शिक्षकची जागा शिवसेना लढवणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघ भाजप शिक्षक परिषदेला सोडण्याची शक्यता असून जितेंद्र पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.

बीड : रमेश पोकळे बुधवारी अर्ज भरणार

भाजपने शिरीष बोराळकरांना उमेदवारी देताच भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक रमेश पोकळेंनी बंडाचे निशाण फडकावले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात बुधवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पोकळे यांनी जाहीर केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोमवारी रात्री बीड दौऱ्यावर येणार आहेत.

क्रमांक दोनचा उमेदवार म्हणून जाहीर करावे

विधान परिषदेच्या निवडणुकीत डॉ.अजित गोपछडे यांची उमेदवारी रद्द करून रमेश कऱ्हाड यांना जशी उमेदवारी देण्यात आली होती अगदी त्याचप्रमाणे पक्षाने पुनर्विचार करून सक्षम उमेदवार द्यावा अथवा पक्षाने क्रमांक दोनचा उमेदवार म्हणून मला जाहीर करावे. कारण पसंती क्रमांकानुसार मतदान पद्धती आहे. - रमेश पोकळे, बंडखोर भाजप

जागावाटप सूत्र : मागच्या वेळी भाजपने जिंकलेल्या मतदारसंघात ज्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता, त्या पक्षाला मतदारसंघ सोडण्याचे सूत्र आघाडीने निश्चित केले आहे.

निवडणूक कार्यक्रम : अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दि. १२ नोव्हेंबर. १ डिसेंबर रोजी मतदान. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी.

बातम्या आणखी आहेत...