आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेठबिगारीसाठी चिमुकल्यांची खरेदी-विक्री:नाशिक, नगरनंतर ठाणे-पालघरमध्येही 2 मुले सापडली, मेंढपाळांवर गुन्हे दाखल

विशेष प्रतिनिधी | नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकी 5 हजार रुपये व एका मेंढीच्या बदल्यात कातकरी पाड्यांवरच्या मुलांची खरेदी करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव दिव्य मराठीने समाेर आणले. त्यानंतर आता कातकरी समाजाच्या गरिबी आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत मेंढपाळांनी बालमजुरांना वेठबिगारीस ठेवण्याचे प्रकार नाशिक-अहमदनगर यापाठोपाठ पालघर व ठाणे जिल्ह्यातही उघडकीस येत आहेत.

श्रमजीवी संघटनेच्या शोधमोहिमेत शहापूर आणि भिवंडी या ठिकाणीही दोन आदिवासी बालमजूर सापडले असून आणखी दोन मेंढपाळांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे नाशिकच्या घटनेनंतर बेपत्ता मुलांचा व फरार आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी असलेले पोलिस, बाल हक्क समित्या, बाल विकास यंत्रणा व कामगार कल्याण आयुक्तालय या सरकारी यंत्रणा मात्र पहिला गुन्हा दाखल होऊन १५ दिवस उलटले तरी बैठका घेण्यात मश्गुल आहेत.

जगण्याचे साधन नाही म्हणून मेंढपाळाच्या हवाली लेकरं करायची आणि मेंढपाळांनी त्यांना वेेठबिगार म्हणून राबवून घेणे हा धक्कादायक प्रकार नाशिकसह अहमदनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत पसरल्याचे पुढे येत आहे. बेपत्ता मुलांचा शोध घेत असता श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते दशरथ भालके यांना शहापूर बाजारात मेंढपाळांसोबत कातकरी मुलगा सापडला. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस येथील आदिवासींकडून त्यांनी या बालकास कामासाठी घेतले होते. शहापूर पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असाच दुसरा मुलगा पडघा येथून कार्यकर्त्यांना सापडला आहे. त्यास वाडा पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले. काल मध्यरात्री मेंढपाळांनी दोन मुलांना इगतपुरीतील वस्तीसमोर आणून सोडले व ते पळून गेले.

2 हजारांत 'बाळग्या' ठेवला

माणिक कोळपे या मेंढपाळाकडे तेरा वर्षांचा किरण (नाव बदललेले) हा आदिवासी मुलगा श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आढळून आला. त्यास त्यांना २ हजार रुपये देऊन “बाळग्या’ म्हणून म्हणजे मालकाची मुले सांभाळण्यासाठी ठेवला होता. या मेंढपाळाविरोधात शहापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिभावली येथील भिकाजी टबले या मेंढपाळाकडे १२ वर्षांचा विनोद (नाव बदललेले) हा आदिवासी मुलगा आढळून आला. त्याला १२०० रुपयांत मेंढ्या चारण्यासाठी खरेदी केले होते. याच्याविरोधात भिवंडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालमजुरांचे तत्काल सर्वेक्षण करा : आंबादास दानवे

या वस्तीला आम्ही भेट दिली असता येथे कोणत्याही शासकीय योजना पोहोचल्या नसल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. आदिवासींची मुले मेंढपाळांकडे, विटभट्ट्यांवर, कुठे हॉटेलमध्ये वेठबिगारीस जुंपली आहेत. त्यांचा ठावठिकाणाच सरकारला नाही. त्यामुळे प्रथम राज्यभर या मुलांचे सर्वेक्षण करावे व त्यांना शिक्षणाच्या, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, अशी मागणी सरकारकडे करीत आहोत.

ना मतदार कार्ड, ना जॉब कार्ड

उभाडे ग्रामपंचायतीतील आदिवासी पाड्याची प्रगती अभियान या स्वयंसेवी संस्थेने पाहणी केली असता येथील ३१ कातकरी कुटुंबांपैैकी कुणाकडेही रोहयोेसाठी आवश्यक जॉब कार्ड नाही, मतदार कार्ड नाही. फक्त प्रौढांकडेच आधार कार्ड असल्याचे पुढे आले आहे. सदर कुटुंबे भूमिहीन असून २०० रुपये रोजाने मजुरी हेच एकमेव उपजीविकेचे साधन आहे. वस्तीत वीज नाही, पाणी नाही. अंगणवाडी आहे ती नाशिक-मुंबई हायवेच्या पलीकडे. वस्तीतील सर्वाधिक शिकलेला एक मुलगा आहे, जो ७ वीपर्यंत गेला व दोन मुली पाचवीपर्यंत गेलेल्या. कुणाकडेही आदिवासी असल्याचा जातीचा दाखला नाही. रेशन कार्ड आहे त्यावर चार वेळा रेशन मिळाले, नंतर नाही. हा पाहणी अहवाल शासनास सादर करून या कुटुंबांना शासकीय योजनांद्वारे शिक्षण, रेेशन आणि रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी “प्रगती अभियान’ संस्थेने केली आहे.

अहवाल सादर करा : डॉ. नीलम गोऱ्हे

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि आदिवासी विकास आयुक्तांशी चर्चा करून पोलिस यंत्रणेकडून चौकशीचा व महसूल व आदिवासी विकास यंत्रणेकडून यांच्या पुनर्वसनाचा अहवाल मागवला आहे.

बातम्या आणखी आहेत...