आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावपळ:राहुल गांधींची भारत जाेडाे यात्रा उद्या महाराष्ट्रात येणार; यात्रेसाठी काँग्रेस नेते गाळू लागले घाम

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत आहेत. राहुल गांधी महाराष्ट्रात दोन रॅलींना संबोधित करतील. कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही यात्रा शेजारच्या तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मदनूर नाका येथे ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पोहोचणार आहे. राहुल गांधी महाराष्ट्रात यात्रेदरम्यान दोन सभांना संबोधित करणार आहेत. १० नोव्हेंबर रोजी ते नांदेड जिल्ह्यात पहिल्या सभेला संबोधित करतील, तर दुसरी सभा १८ नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे होणार असल्याचे यात्रेचे राज्य समन्वयक, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान या भारत जोडो यात्रेत सुमारे २५ किलोमीटर पायी चालावे लागत असल्याने महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसह विविध सामाजिक संघटना व विविध पक्षांतील नेते सध्या फिटनेस मोडवर गेले आहेत. चालण्याचा सराव करण्यासह यात्रेदरम्यान राहुल गांधींशी सोबत राखण्यासाठी व्यायाम करत ते घाम गाळत आहेत.

भारत जोडो यात्रा शेजारील तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पोहोचणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, त्यांच्यासह इतर नेते राहुल गांधींसाेबत चालण्यासाठी वेगाने चालण्याचा सराव करण्यासह व्यायाम करत आहेत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ते यात्रेसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी वॉर्मअप व्यायाम आणि पुशअप करत आहेत. नांदेडमधील नागरिक यात्रेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. आम्हाला वेळ मिळेल तेव्हा आम्ही सराव आणि व्यायाम करत आहोत. चालणे आरोग्यासाठी चांगले आहे. पक्षाचे प्रदेश प्रमुख या नात्याने राहुल गांधींसोबत राज्यातील संपूर्ण ३८२ किलोमीटरचा प्रवास करणे हे आपले कर्तव्य आहे, असेही नाना पटोले म्हणाले. काँग्रेस नेते तथा नांदेडचे आमदार डी. पी. सावंत म्हणाले की, राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते या भारत जोडो यात्रेदरम्यान शक्य तितके चालण्याचा प्रयत्न करतील.

१५ विधानसभा, ६ लोकसभा मतदारसंघांतून जाणार यात्रा भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास १४ दिवसांचा असून या १४ दिवसांच्या प्रवासात १५ विधानसभा आणि ६ लोकसभा मतदारसंघातून प्रवास होणार आहे.. ही यात्रा सोमवारी सायंकाळी देगलूर येथील मदनूर नाक्यावर पोहोचणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता देगलूर बसस्थानकावरून पदयात्रेला पुन्हा प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने या यात्रेच्या स्वागतासाठी चोख व्यवस्था केली असून या यात्रेला संपूर्ण राज्यातील काँग्रेस नेत्यांसह विविध पक्ष, संघटना, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...