आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

घडामाेड:राज्यातील काँग्रेसमधील बदलांना राहुलच्या परतण्याचे लागले वेध, पुनर्स्थापना होताच काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाॅकडाऊन लावताना कोणत्याच जिल्ह्यात विश्वासात घेतले नाही; काँग्रेसची सरकारवर नाराजी

राहुल गांधी हे ऑगस्टमध्ये पुन्हा अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार असून त्यात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या ठिकाणी नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाचे अध्यक्षपद स्वत: सोडले होते. सध्या सोनिया गांधी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा आहेत. राहुल यांनी अध्यक्षपद सोडून आगामी ९ ऑगस्टला बरोबर एक वर्ष होत आहे. वर्षपूर्तीनिमित्त राहुल यांनी पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारावी, अशी खुद्द सोनिया गांधी यांची इच्छा आहे.

राहुल यांची पुनर्स्थापना होताच काँग्रेसमध्ये संघानात्मक बदल होणार आहेत. त्यात महाराष्ट्राचासुद्धा समावेश आहे. राज्याचे प्रदेशाध्यक्ष असलेले बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेस विधिमंडळ नेता, महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी तीनतीन महत्वाची पदे आहेत. परिणामी, पक्षाच्या संघटनात्मक कामांसाठी ते पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, म्हणून राज्यात स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष नेमावा, अशी काँग्रेसमध्ये मागणी आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले इच्छुक आहेत. राहुल यांची कार्यपद्धती पाहता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद एखाद्या तरुण नेत्यांकडे जाईल, असे सांगितले जाते. राज्यसभा खासदार राजीव सातव राज्यात परतणार नाहीत. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस वर्किंग कमिटीत मोठी जबाबदारी मिळू शकते.

राजस्थानमध्ये गेहलोत आणि पायलट संघर्षाला प्रदेशाध्यक्षपदाची किनार आहे. प्रदेशाध्यक्ष नात्याने पक्षाच्या खर्चाची जबाबदारी सचिन पायलट यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना आणखी मंत्रालये हवी आहेत. महाराष्ट्रात नवा प्रदेशाध्यक्ष निवडताना पक्ष चालवण्यासंदर्भातल्या त्याच्या क्षमतेचा विचार होईल, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.

कोरोनामुळे दिल्लीत बैठका, मीटिंग थंडावल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे व्हर्च्युअल संमेलन घेऊन राहुल गांधी यांची पुनर्स्थापना करण्याचा पक्षात विचार चालु आहे. त्याकडे राज्यातील काँग्रेसजन डोळे लावून बसले आहेत.

विश्वासात घेतले नाही; काँग्रेसची सरकारवर नाराजी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आणि काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना आठ-आठ दिवस वाट पाहावी लागते. लाॅकडाऊन लावताना काँग्रेसच्या नेत्यांना कोणत्याच जिल्ह्यात विश्वासात घेतलेले नाही, आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला निर्णयप्रक्रियेत स्थान नाही, त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्ते नाराज आहेत.