आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भय कोरोनाचे:7 व 8 सप्टेंबर रोजी दाेनच दिवसांचे पावसाळी अधिवेशन, प्रत्येक आमदाराची आधी चाचणी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमदार बसणार प्रेक्षक गॅलरीत, स्वीय सहायकांना विधिमंडळ प्रवेशास मनाई

दोन आठवड्यांचे अधिवेशन म्हणून गवगवा झालेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोनामुळे अखेर दि. ७ व ८ सप्टेंबर असे दोनच दिवसांत उरकण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. तसेच विधिमंडळ सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, सर्वच राज्यांनी अधिवेशन एक ते दोन दिवसांत उरकले आहे. त्यामुळे आपण अधिवेशन कमी कालावधीचे करण्याचा निर्णय घेतल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.

पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठका मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.

प्रत्येक आमदाराला सुरक्षा किट

फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्यासाठी आमदारांची बसण्याची व्यवस्था सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीत करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक आमदाराला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. त्यात चेहरा झाकण्याचे पारदर्शक पटल, मुखपट्टी, हातमोजे, सॅनिटायझर आदींचा समावेश असेल.

स्वीय सहायकांना प्रवेशबंदी

आमदारांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. स्वीय सहायकांची आणि आमदारांच्या वाहनचालकांची बसण्याची तसेच अल्पोपाहार आदी व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबूत करण्यात येईल.

‘आरटीपीसीआर’ चाचणी ६ तारखेला

चाचणीसाठी एक दिवस अगोदर आमदारांना मुंबईत हजेरी लावावी लागेल. सहायकाशिवाय अधिवेशन करावे लागेल. शिवाय अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे ६ सप्टेंबर रोजी विधानसभेतील सर्व २८८ आणि परिषदेतील ७८ आमदारांची कोविडची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात येणार आहे. ज्या आमदारांची कोविड चाचणी निगेटिव्ह असेल त्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल.

पुरवणी मागण्या, ७ शासकीय विधेयके

अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या , ७ शासकीय विधेयके आणि एका विनियोजन विधेयकाचा समावेश असेल, अशी माहिती विधानमंडळ सचिव ॲड. राजेंद्र भागवत यांनी दिली.

अधिकारी-पत्रकारांबाबत संभ्रम :

> अधिकारी, पत्रकारांना सभागृहात प्रवेश असणार का, त्यांची कोरोना चाचणी करणार का, याबाबत संभ्रम आहे.

> आमदारांच्या कोरोना चाचण्या आरटीपीसीआर असतील

> सहव्याधी असलेल्या (कोमॉर्बिडिटी) आमदारांना काळजी घेण्याबाबतच्या सूचना त्या-त्या पक्षाच्या गटनेत्यांकडून दिली जाणार आहे.