आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Raj Thackeray And Nitin Gadkari Meet Mumbai | Marathi News | The Morning Swearing in Takes Place; Do You Feel Nauseous After Eating With Gadkari? MNS Question

राज ठाकरे - नितीन गडकरी भेट:पहाटेचा शपथविधी चालतो; गडकरींसोबत जेवण केलं तर तुम्हाला मळमळ होते? मनसेचा सवाल

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रात्री मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट पार पडली आहे. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या या भेटीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजपची युती होणार का? याबाबत चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान या भेटीवरुन राज्यात आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यावरुन मनसेचे राज्य सचिव व प्रवक्ते योगेश खैरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावले आहे. खैरे यांनी ट्विट करीत प्रत्युत्तर दिले आहे.

''भाजपाला तुम्ही न मागता दिलेला पाठिंबा चालतो...त्यांच्याशी पहाटेचा शपथविधी चालतो आणि आमच्या नेत्यांनी बरोबर जेवण केले तरी तुम्हाला मळमळ होते! आपको ये बात कुछ हजम नही हुई... हाजमोला खाओ खुद जान जाओ,'' असे ट्विट योगेश खैरे यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ठाकरे-गडकरी भेटीवर टीका केली आहे.

पुढे खैरे म्हणाले की, काल राजसाहेब आणि गडकरी साहेबांनी एकत्र जेवण केले, त्यामुळे यांच्या(महाविकास आघाडी) पोटात मळमळ सुरू झाली. मनसे आणि भाजपा युतीचा सध्या तरी काही प्रस्ताव नाही. पण तशी झाली तर ती अभद्र युती आणि ज्या शिवसेनेने खालच्या भाषेत तुमच्या नेत्यांवर टिका केली होती त्यांच्याशी मात्र तुमची पवित्र युती..? असा सवाल खैरे यांनी उपस्थित केला आहे.

गुडी पाडवा मेळाव्यात मनसेचा हल्लाबोल

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचे देखील राज ठाकरे यांनी कौतुक केले. येत्या काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे विविध चर्चा रंगत आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे.

दोन तास रंगली चर्चा

राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यात जवळपास दोन तास बैठक झाली. स्वाभाविकच या भेटीत राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीन गडकरी यांनी जरी ही राजकीय भेट नाही असे म्हटले असले तरी या दोन तासांच्या बैठकीत त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

...ही एक कौटुंबिक भेट- गडकरी

या भेटीबाबत गडकरी म्हणाले की, "ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि पारिवारीक भेट होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही" ही एक कौटुंबिक भेट असल्याचे बोलले गेले होते. मात्र, तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट म्हणता येणार नाही. कारण, गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंची हिंदूत्वाच्या संदर्भात घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. यासोबतच मनसे आणि भाजप यांची आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकांत युती होण्याचीही गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...