आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचे प्रत्युत्तर:राज ठाकरे 3-4 महिने भूमिगत राहतात आणि मग एखादे व्याख्यान देतात; राष्ट्रवादी काँग्रेस जातीपातीचे राजकारण करत नाही

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जातीपातीचे राजकारण केले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीपातीचे राजकारण वाढले, असा आरोप काल गुढीपाडवा मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे 3, 4 महिने भूमिगत राहतात आणि मग एखाद व्याख्यान देतात. त्यांच्या भूमिकेत अजिबात सातत्य नसत. सर्व जातीधर्मियांना सोबत पुढे घेऊन जाण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आहे. आम्ही कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले आहे.

उत्तर प्रदेशात विकास होत आहे. ही चांगली बाब असल्याचे राज ठाकरे काल म्हणाले होते. तसेच आपण लवकरच अयोद्धेला जाणार असल्याचेही ते म्हणाले होते. यावरदेखील शरद पवार यांनी राज ठाकरेंना उत्तर प्रदेशात काय दिसले हे त्यानांच माहित असा टोला लगावला आहे.

मनसेचा आकडा तो किती?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसेने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. मुंबई महापालिकेसारख्या महत्त्वांच्या निवडणुकांमध्ये याचा कितपत परिणाम होईल असे शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मुंबई महापालिकेसह इतर निवडणुकांमध्ये राज ठाकरेंचा पक्ष किती प्रमाणात सहभागी होईल, हे माहित नाही. मागील निवडणुकांमध्येही त्यांचा पक्ष विशेष कामगिरी करू शकलेला नाही. त्यांच्या निवडून आलेल्या उमेदवारांचा आकडा बोटावर मोजण्याइतपतही नसतो. त्यामुळे ते आता कितपत प्रभाव पाडू शकतील, हे सांगता येत नाही, असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला.

महागाईमुळे लोकांना यातना, मात्र केंद्र सरकार हिंदुत्वाचा अजेंडा राबवतय!
समाजातील सर्व स्तरातील लोकांना सध्या महागाईचा प्रचंड त्रास होत आहे. रोज किमती वाढत आहेत. निवडणुका संपताच अशा पद्धतीने रोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचे या देशाने पुर्वी कधी पाहिले नाही. त्यामुळे सामान्यांना प्रचंड यातना होत आहे. मात्र, याकडे केंद्रातील सत्ताधारी अजिबात लक्ष देण्यास तयार नाही. याऐवजी त्यांच्याकडून हिंदुत्वाचाच अजेंडा राबवला जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली. तसेच, पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे धान्यासह इतर जीवनावश्यक वस्तुंच्याही किंमती वाढत आहेत. त्यांची किंमत शेवटी लोकांनाच चुकवावी लागत आहे. मात्र, या मुद्द्याकडेही एवढे दुर्लक्ष झाल्याचे कधी पाहिले नाही, असे शदर पवार म्हणाले.

अशा राजकारणामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येईल!
सामाजिक ऐक्य धोक्यात यईल, अशी गंभीर विधाने सध्या देशात सत्ता असलेल्यांकडूनच केली जात आहेत. समाज एकसंघ ठेवणे, वेगवेगळ्या जाती-धर्मियांमध्ये एकोपा राहिल, यासाठी खरे तर सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दोन जाती-धर्मीयांमध्ये तेढ निर्माण होईल, अशी विधाने केली जात आहेत. देशाच्या दृष्टीने हे अतिशय घातक असल्याचे शरद पवार म्हणाले.

कश्मीरमधून हिंदूंना बाहेर काढण्यासाठी भाजपनेच गाड्या पुरवल्या!
कश्मीर फाईल्स चित्रपटात सत्य दाखवलेले नाही. ज्यावेळी कश्मीरमध्ये हिंदुंविरोधात दंगली भडकल्या, तेव्हा देशात सत्तेची सुत्रे भाजपच्याच हातात होती. तेव्हा हिंदुना कश्मीर खोऱ्यातून बाहेर काढण्यासाठी भाजपनेच गाड्या पुरवल्या. काँग्रेस तेव्हा सत्तेतही नव्हती. हे सत्य असतानाही चित्रपटात काँग्रेसलाच जबाबदार धरले आहे. त्यावर हा चित्रपट पाहिला पाहिजे, तो मोफत दाखवला पाहिजे, असे देशातील सर्वोच्च नेतेच लोकांना सांगत आहेत. याचा अर्थ धार्मिक तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घ्यायचा, यावर केंद्रीय सत्ताधाऱ्यांचा भर आहे. लोकांच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष नाही. नागरिकांच्या दृष्टीने हे योग्य नाही, असे पवार म्हणाले.

युपीएच्या नेतृत्वात अजिबात रस नाही!
शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) नेतृत्व करावे, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. यावर युपीएच्या अध्यक्षपदात मला अजिबात रस नाही. ती जबाबदारी मी घेणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. संसदेत शक्तीशाली विरोधी पक्षाची गरज आहे. अन्यथा देशाची अवस्था चीन व रशियासारखी होईल. कदाचित देशातच एखादा पुतीन तयार होईल, असा टोला पवार यांनी अप्रत्यक्षपणे मोदींना लगावला. तसेच, आता जनाधार असलेल्या पक्षांनी एकत्र यावे. काँग्रेसचे कार्यकर्ते देशात सर्वत्र आहे. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

ईडीशिवाय आता एक दिवस जात नाही!
एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात ईडीचे धाडसत्र सुरू असताना राज्य सरकारकडून मात्र भाजप नेत्यांविरोधात कारवाया केल्या जात नाही. यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चांबाबत शरद पवार म्हणाले, सत्तेचा गैरवापर करावा, अशा संस्कारात आम्ही वाढलो नाही. आता ईडीच्या धाडींवरून आम्हाला काहीही आश्चर्य वाटत नाही. मात्र, राजकीय विरोधकांना संपुष्टात आणण्यासाठी तपास यंत्रणांचा असा वापर यापुर्वी कधीही झालेला नाही. दहा वर्षांपुर्वी ईडी कोणाला माहितही नव्हती. मात्र, आज ईडीशिवाय एक दिवस जात नाही. लोकांना सत्तेचा असा गैरवापर आवडत नाही. ते मतदान पेटीतून धडा शिकवतील, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

अनिल देशमुखांविरोधात आता 1 कोटी वसुलीचाच आरोप!
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सर्वप्रथम 100 कोटी वसुलीचा आरोप झाला. तशी चार्जशीटही ईडीने कोर्टात दाखल केली. नंतर दुसरी चार्जशीट 4 कोटी 70 लाखांची दाखल केली. आता तिसरी चार्जशीट 1 कोटी 7 लाखांची दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ईडी ही कारवाई कोणाच्या सांगण्यावरून करतेय, हे लोकांना आता समजतेय, असे शरद पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...