आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही. पक्षांतर्गत बाबींवर सोशल माध्यमात गरळ ओकू नका आधी. आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतःच्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला आहे.
राज ठाकरेंचे पत्र जशास तसे
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र,
सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही. माझ्या पक्षातल्या कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा. ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या ! आपलाच, राज ठाकरे
राज ठाकरेंनी हा इशारा का दिला?
मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पदावरुन हकालपट्टी केल्याचे समोर आले आहे. माझिरे यांना पदावरून हटवण्यात आल्याचं एक पत्र देखील मनसे अधिक़ृत या ट्विटरवरून शेअर केले आहे.
मनसेच्या शहर कोअर कमिटीवर आणि मनसे नेते बाबू वागस्कर यांच्यावर गंभीर आरोप करत माझिरे यांनी पक्ष सोडला होता, त्यानंतर 'बाबू वागस्कर हटाव मनसे बचाव' अशी मोहीम देखील माझिरेच्या समर्थनार्थ सुरु झाली होती.
निलेश माझिरे यांना मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पक्षात प्रवेश दिला होता. तेव्हापासून माझिरे हे मोरेंचे निष्ठावंत आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र, माझिरे यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांचा आणि आमचा संबंध संपला अशी थेट भूमिका वसंत मोरेंनी घेतली होती. तर दुसरीकडे मला देखील वसंत मोरेंची गरज नसल्याचे प्रत्युत्तर माझिरे यांनी दिले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी एक पत्रच जारी करीत सर्वच मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.