आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ' रत्नागिरी राजापूर रिफायनरी'सारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. राज्याचे दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी.' असे मागणी करणारे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरून कोकणामध्ये राजकारण सुरू आहे. या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून विरोध केला जात आहे. या मुद्द्यावरुनच आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
राज ठाकरे या पत्रामध्ये म्हणाले आहेत की, 'कोकणावर निसर्गाने सौंदर्याची जितकी मुक्त उधळण केली आहे तितकी इतर ठिकाणी फारशी आढळत नाही ह्या विषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही. प्रत्येक पर्यटन स्थळ हे एखाद्याच विशिष्ट ऋतूत खुलून दिसतं आणि इतर वेळेस ते तितकं मनाला भावत नाही. पण कोकणच्या बाबतीत मात्र निसर्गाने कमाल केली आहे. तिन्ही ऋतूत कोकण सुंदर दिसू शकतं आणि म्हणूनच पर्यटन हा कोकणाचा आणि पर्यायाने माझ्या कोकणी माणसाच्या जगण्याचा श्वास होऊ शकतो. कोकणचं कॅलिफोर्निया होणार असं जेंव्हा जेंव्हा मी ऐकतो तेंव्हा मला त्याचा अर्थ कळत नाही. कारण खरं तर कोकणाला विकासाच्या कुठल्याच मॉडेलची गरज नाही उलट तेच जगातील विकासाचं एक उत्कृष्ट मॉडेल बनू शकतं. अर्थात ह्या दृष्टीने एक समग्र विचार कधीच झाला नाही जो आता व्हायला हवा असं मला वाटते'
'कोकण जितका निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे तितकाच सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहे आणि नरोत्तमांची खाण आहे. मी माझ्या भाषणात अनेकवेळा ह्याचा उल्लेख केला आहे की 'कोकण किनारपट्टी' असा जर भौगोलिक परिसर बघितला तर ह्या भूमीने 7 भारतरत्ने दिली आहेत. त्यातील 4 तर फक्त एकट्या दापोलीमधील आहेत. पण इतके असून देखील कोकणी तरुण विषण्ण मनस्थितीत आहे. त्याला नोकरीसाठी, रोजगारासाठी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागते. खरे तर पर्यटन कोकणाचे भवितव्य बदलू शकतं पण तो विचार नीट झाला नाही. एखादा मोठा प्रकल्प येईल, त्याने भविष्य बदलेल असे आशेचे किरण दिसले खरे पण ते प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत' असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.