आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेची मागणी:मुंबई लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले - 'कमीत कमी लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी सेवा सुरू करा'

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करू देण्यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. तसेच कमीत कमी ज्यांनी लसीचे 2 डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी मुंबई लोकल तातडीने सुरू करण्यात यावी असेही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ही जवळपास ओसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येमध्येही घट होताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. असे असताना मुंबईतील लोकल सेवा ही बंद आहे. यामुळे मुंबईत नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या मुद्द्याकडे लक्ष केंद्रीत करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करू देण्यासंदर्भात सरकारने तातडीने पावले उचलावी असे राज ठाकरेंनी पत्राद्वारे म्हटले आहे.

लोकल बंद याने नेमके काय साध्य होणार?
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, 'गेल्या 15 महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहे, ते तर अनाकलनीय आहेत. मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालये ही सुरू आहेत. सर्वांना घरून काम करता येणे शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारने बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्याने रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद याने नेमके काय साध्य होणार?' असा सवाल राज ठाकरेंनी पत्राद्वारे विचारला आहे.

धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'ही साथ एकाएकी जाणार नाही, असे जगातील तज्ञाची मते आहेत. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथीबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहेच, परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतेय असं की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही.'

बातम्या आणखी आहेत...