आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा शरद पवारांवर आरोप:मुस्लिम मतांसाठी शिवरायांचे नावही घेत नाहीत, महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू केले

सिंधूदूर्ग4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम मते दूर जातील, या भीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधीही जाहीर भाषणांत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. केवळ शाहु-फुले-आंबेडकरांचेच नाव घेतात, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

पक्षबांधणीसाठी राज ठाकरे आज सिंधूदूर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसनेच आपल्या फायद्यासाठी मराठा व इतर समाजात फूट पाडली.

शिवरायांबाबत जाणीवपूर्वक वाद

राज ठाकरे म्हणाले, सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्य तसेच चित्रपटातील शिवइतिहासाबाबत वाद सुरू आहेत. मात्र, हे वाद जाणूनबुजून निर्माण केले जात असून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात असे जातीय वाद होत नव्हते किंवा फार कमी प्रमाणात होत होते. तेव्हा काय माणसं इतिहास वाचत नव्हती का? आता सगळेजण वाचायला लागलेत का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

राष्ट्रवादीकडून शिवरायांच्या नावाचा वापर

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू झाले. शरद पवार आपल्या जाहीर भाषणांत कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. याबाबत मी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले होते की, 'शाहू-फुले-आंबेडकर हा एक विचार आहे, म्हणून मी त्यांचे नाव घेतो.' मात्र, हा मूळ विचार छत्रपती शिवाजी महाराजांचाच आहे. हा मूळ विचार घेऊन शाहू-फुले-आंबेडकर यांनी कार्य केले ना?

मराठा व इतर समाजात फूट

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीने 1999 पासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू केले. शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. मात्र, त्यांनी काही टोळ्या निर्माण केल्या आहेत. त्यांचा वापर करून मराठा व इतर समाजात फूट पाडली जाते. नंतर दोन्ही समाज आपल्या खिशात घालायचे, असे पवार यांचे राजकारण आहे.

समान नागरी कायदा लागू करा

राज ठाकरे म्हणाले, समान नागरी कायदा लागू करा, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. मात्र, केवळ राज्यात हा कायदा लागू करता येणार नाही. याबाबत केंद्राला कायदे बनवण्याचे अधिकार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्युत्तर: राज ठाकरे यांना कोणत्याच निवडणुकीत यश मिळत नाही, या नैराश्यातून शरद पवारांवर टीका

राज ठाकरे यांना स्वतः चे ध्येयधोरण नसल्यामुळे त्यांच्या पक्षाला कुठल्याच निवडणुकीत यश मिळत नाही. त्या नैराश्यातून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. महेश तपासे म्हणाले, निवडणुका आल्या की शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय बातमी बनत नाही, हे समीकरण राज ठाकरे यांना कळाले आहे. त्यामुळेच ते आता शरद पवारांवर टीका करत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...