आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा ट्विटरवरून बाण:बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा, भोंग्यांवरील भूमिकेची करून दिली आठवण

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

4 मेपर्यंत राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरवा, असा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला होता. त्यानुसार तो अल्टिमेटम आज संपत आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकही आक्रमक झाले असून काही ठिकाणी मशिदींसमोर मनसैनिकांनी भोंग्यांवर हनुमान चालिसाही लावली आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी ट्विटरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्विट करून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे मशिदींवरील भोंग्यांबाबत आपली सडेतोड भूमिका मांडताना दिसत आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडिओत भाषण करताना बाळासाहेब ठाकरे म्हणत आहेत की, 'ज्यादिवशी माझे सरकार येईल तेव्हा रस्त्यावरील नमाज बंद होतील. मशिदींवरील लाऊडस्पीकर बंद होतील. धर्म राष्ट्रविकासाच्या आड येऊ नये. धर्मामुळे कोणालाही उपद्रव होता कामा नये. हिंदु धर्माचाही कोणाला उपद्रव होत असेल तर आम्ही त्याचा बंदोबस्त करू.' हा व्हिडिओ ट्विट करून राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या भूमिकेची शिवसेनेला आठवण करून दिली आहे. व्हिडिओ ट्विट करताना त्यावर कोणतेही भाष्य मात्र राज ठाकरे यांनी केलेले नाही. मात्र, या ट्विटला आता शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पहावे लागणार आहे.

राज ठाकरे यांनी केलेले ट्विट.
राज ठाकरे यांनी केलेले ट्विट.

दरम्यान, राज्यभरातून मनसेने दिलेल्या अल्टिमेटमवरून पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान पार पडली, तर नाशिक आणि ठाण्यात अजानच्या वेळी लाऊडस्पीकर लावल्याने मनसेनेही लाऊडस्पीकरवरून दुप्पट आवाजात हनुमान चालिसेचे पठण केले. पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन करण्याचं आवाहन मनसेने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...