आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजन विचारेंची शिंदे गटावर कडाडून टीका:म्हणाले- घमेंडखोर गनिमांना औकाद दाखवायला शिवसैनिक कमी पडणार नाही

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी शिवसैनिकांना पत्र लिहित शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनिष्ठ शिवसैनिकांनो हे नवे वर्ष अन्याय सहन करायचे नाही, असे म्हणतानाच घमेंडखोर गनीमांना त्यांची औकाद दाखवायला आपण कमी पडणार नाही याचा मला सार्थ विश्वास आहे असेही राजन विचारे यांनी म्हटले आहे.

नेमके काय आहे पत्रात?

राजन विचारे म्हणाले की, सत्तेसाठी आमदार फोडून 56 वर्षांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, आपली अस्मिता असलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवले असे म्हणत शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. तर राज्यातील हक्काचे प्रकल्प बाहेर जात असल्याने राज्यातील तरुण बेरोजगार होत असल्याचा आरोपही खासदार राजन विचारे यांनी केला आहे.

नव्या वर्षात पदार्पण करताना आपण जुने वाद, भांडण विसरायचे असतात. वाद-भांडण असती तर विसरूनही गेलो असतो.. पण अन्याय, जखमा, स्वार्था सत्ताकारण यांना कसे विसरायचे. रातोरात आमदारांना पळवून आपल्या 56 वर्षांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसला, आपल्या हक्काचे प्रकल्प बाहेर नेऊन मराठी तरूणांना बेरोजगार केले आपली अस्मिता असणारे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले, ईडीचा धाक दाखवून शिवसेना फोडली, राज्याचा पालक म्हटले जात तोच मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून भूखंडाचे गैरव्यवहार करतो, राज्यात महापुरूषांचा अवमान होत आहे, सच्चा शिवसैनिक अन्यायाविरोधात आवाज उठवतो तेव्हा त्याला अमानुष मारहाण केली जाते. खोटे गुन्हे दाखल केले जातात.

बाळासाहेबांना वेदना होत असतील

केंद्रात, राज्यात, कर्नाटकात त्यांचीच सत्ता असताना या महाराष्ट्राला कोणी वाली नाही, असा महाराष्ट्र पाहताना आपले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे हे जिथे कुठे असतील त्यांना किती वेदना होत असतील, असेही यात म्हटले आहे.

येणारे नवीन वर्ष हे अन्याय सहन करण्याचे नाही. आपल्या रक्ताच्या थेंबा-थेंबात आक्रोश आहे. तो तसाच उफाळून दे.. कारण या आक्रोशाची आज महाराष्ट्राला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला गरज आहे. घमेंडखोर गनिमांना त्यांची औकाद दाखवायला आपण कमी पडणार नाही याचा मला सार्थ विेश्वास आहे, असे म्हणत शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

बातम्या आणखी आहेत...