आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातवांना सर्वपक्षीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली:कोरोनानंतर सातवांना भेटणार होतो, मात्र आता भेट होणार नाही : आदित्य

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सातव सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व : फडणवीस

काँग्रेसचे दिवंगत नेते खा. राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत देशातील सर्वपक्षीय खासदार आणि नेत्यांनी राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. सातव यांच्या आठवणींना उजाळा देताना महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, नेहमी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा आमचा भाऊ आमच्यातून निघून गेला. मत्स्य संवर्धनमंत्री अस्लम शेख म्हणाले, सातव यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले. एक मोठे नेतृत्व हरपले.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले, कमी वयात शिखर गाठल्यानंतरदेखील राजीव सातव विनम्र राहिले. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाविकास आघाडी कायम राहावी म्हणून सर्वात जास्त सजग असणारा नेता म्हणजे राजीव सातव. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, कोविडनंतर मी राजीव सातव यांना भेटणार होतो, परंतु ती भेट आता कधीच होणार नाही. गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजीव सातव यांचे विचार, त्यांची स्मृती जिवंत ठेवणे गरजेचे आहे. राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले की, रस्त्यावर उतरून आंदोलने कशी करायची हे खऱ्या अर्थाने मला राजीव सातव यांच्याकडून शिकायला मिळाले.

सातव नेहमी माझ्या बाजूने उभे राहिले : तांबे
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले की, कोणतीही समस्या असो, राजीव सातव हे नेहमीच माझ्या बाजूने उभे राहिले. अगदी कमी वयातच त्यांनी जिल्हापातळीपासून आपली राजकीय वाटचाल सुरू केली होती. त्यानंतर युवक काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करत मोठी मजल मारली होती. परंतु आज असे उमेदीच्या वयात त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही न भरून निघणारी आहे, अशी हळहळ काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून आणि सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सातव सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व : फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजीव सातव यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या पक्षात नसलो तरी राजीव सातव हे नेहमीच माझी विचारपूस करत असत. ते सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, राजीव सातव हे अतिशय अभ्यासू आणि तितकेच नम्र वृत्तीचे नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजीव सातव हे एक उत्तम, अभ्यासू संसदपटू होते, त्यांचा अभ्यास, वक्तृत्व आणि आविर्भाव संसदेत बरेच काही शिकवून गेले. बी. व्ही. श्रीनिवास म्हणाले की, कोणत्याही आपत्तीत कसे काम करायचे हे खरं तर मला सातवांकडून शिकायला मिळाले.

बातम्या आणखी आहेत...