आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर व सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारे निर्णय
राजू शेट्टी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहून समाधान वाटले, पण हेच विरोधी पक्ष जेव्हा सत्तेत होते तेव्हा भूमीअधिग्रहण दोन टप्प्यातील एफआरपी यासारखे शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारी निर्णय घेताना यांच्यातील शेतकरी प्रेम विधीमंडळाच्या कोणत्या खुंटीला टांगले होते? तेव्हा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षात असताना या प्रश्नावर सभागृहात गोंधळ घातला आणि सत्तेत आल्यावर निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर मूग गिळून गप्प का आहेत? शेतकऱ्यांनो राज्यातील विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात आणि सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही आंदोलन
दरम्यान, आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शेतीसह वाढती महागाई, वीजप्रश्नांनवर विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या मुद्द्यावर जोरदार आंदोलन केले. हे प्रश्न सोडवा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही तीव्र पडसाद
राज्यात कांद्याचे भाव अवघ्या 2 ते 3 रुपये किलोंवर आले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात याचे तीव्र पडसाद उमटले. कांद्याचे दर वाढावेत म्हणून राज्य सरकारने तातडीने कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तर, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन कांदा निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. सध्या केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. सरकार कांदा उत्पादकाच्या पाठीशी आहे, असे उत्तर दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.