आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॅन व आधार कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकार सर्वसामान्यांकडून प्रत्येकी 1 हजार रुपयांची खंडणी वसूल करत आहे. अशा पद्धतीने केंद्राच्या आयकर विभागाकडून देशातील जनतेवर 44 हजार कोटींचा दरोडा टाकला जात आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली आहे.
आझाद मैदानात आंदोलन
ऊस तोडणी मशीन मालकांना तातडीने अनुदान द्यावे तसेच ऊसतोड मजुरांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी ऊस तोडणी मजूर, मशीन मालक यांचे प्रश्न मांडतानाच पॅन व आधार कार्डच्या लिंकिंगवरुन केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. तसेच, या धोरणाविरोधात सर्वसामान्यांनीही आवाज उठवावा, असे आवाहन केले.
केंद्र सरकारचा जिजीया कर
राजू शेट्टी म्हणाले की, आयकर विभागाने देशातील 44 कोटींहून अधिक पॅन कार्ड ग्राहकांना आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅन कार्ड धारकाकडून आधार लिंक करण्यापोटी 1 हजार रूपयाचा जिजीया कर आकारला आहे. यामुळे देशातील जनतेवर 44 हजार कोटीचा दरोडा पडणार आहे.
सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला
राजू शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारने डिजिटल धोरणाच्या नावाखाली पॅनकार्ड धारक व्यक्तींनी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅनकार्ड धारकास आता 1 हजार रूपये शुल्क भरणे बंधनकारक केले आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारून केंद्र सरकार तब्बल 44 हजार कोटी रूपयाचा दरोडा टाकत आहे. सध्या जनतेला कोणताही व्यवहार अथवा नोंदणी करत असताना आधार कार्ड व पॅन कार्ड असण बंधनकारक करण्यात आलेले आहे.
धोरणाविरोधात सर्वसामान्यांनी आवाज उठवावा
राजू शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात कराची आकारणी करून वाढलेल्या महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडत आहे. यामुळे या तुघलकी धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याकरिता येत्या रविवारी (ता. 9) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत #स्टॅापरॅाबरी #stoprobbary हा संदेश ट्वीटरवर ट्रेंड करावा. तसेच, हा संदेश फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पाठवावा, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले आहे. तसेच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या nsitharaman@nic.in या मेलवर आधार व पॅन लिंक करण्याच्या धोरणाविरोधात आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.