आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दलित समाजातील असल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारकडून अन्याय होत असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी केला. आपला राणा दाम्पत्याला पुर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले.
नवनीत राणा यांच्यावर महाराष्ट्र सरकारने मोठा अन्याय केल्यामुळे मी नेहमीच त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी याबाबत लोकसभा अध्यक्षांची भेटही घेतली होती आणि त्यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली. तसेच आठवले पुढे म्हणाले की, नवनीत राणा देशद्रोहाचा खटला लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जात आहे. हनुमान चालिसा वाचण्याच्या नावाखाली देशद्रोहाचा गुन्हा लावू नये. नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्याय मिळाला पाहिजे.
राणा दाम्पत्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली
आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यासाठी आणि न्याय मिळेल, या अपेक्षेसाठी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. मुंबई पोलिसांनी आपल्याविरोधात चुकीची कारवाई केली तसेच आपल्याला हीन दर्जाची वागणूक दिल्याचं त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सांगितले.
काय प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. नवनीत राणांची भायखळा कारागृहातून 5 मे रोजी 12 व्या दिवशी सुटका झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना संध्याकाळी 5 ऐवजी दुपारीच सोडण्यात आले होते. राणा दाम्पत्यावर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता आणि त्यांना 14 दिवसांसाठी तुरुंगात पाठवले होते. कारागृहातुन बाहेर आल्या नंतर नवनीत राणा घरी न जाता थेट लीलावती रुग्णालयात भरती झाल्या होत्या. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर नवनीत राणा यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. राणा दांपत्याला जामीन देताना गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलू नये, अशी अट न्यायालयाने लादली होती. मात्र तरीही राणा दांपत्याने प्रसारमाध्यमांना मुलाखती देणे सुरु केल्याने तो अटीचा भंग आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.