आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदमांच्या कारचा अपघात:टँकरची धडक, प्रकृती सुखरुप; समर्थकांकडून घातपाताची शंका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. मात्र त्यांचे चालक दीपक कदम व सुरक्षेसाठी असलेले 2 पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत.

आमदार योगेश कदम यांच्या चालकाला चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. रूग्णालयात आमदार योगेश कदम स्वतः उपस्थित आहेत. टँकरच्या जोरदार धडकेत अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

असा घडला अपघात

आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि चालकही पळून गेला. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी पुढे असलेल्या पोलिसांच्या गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.

रामदास कदम शिंदे गटात

योगेश कदम हे खेड दापोली-खेड-मंडणगड मतदारसंघातून आमदार असून माजी मंत्री रामदास कदम यांचे ते पुत्र आहेत. शिवसेनेत फुट पडून शिंदे गटाची निर्मिती झाल्यानंतर रामदास कदम यांनी ठाकरे गटातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. ते आता शिंदे गटात आहेत.

काळजी करू नका आम्ही सर्व सुखरूप

आमदार योगेश कदम यांची अपघातानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी सुखरूप आहे, काळजी करू नका. आई जगदंबेच्या कृपेने आम्ही सर्व सुखरूप असल्याचा संदेश त्यांनी व्हिडिओ शेअर करून दिला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रम ठरल्यानुसार होतील अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.

अपघात कि घातपात?

टँकर चालक फरार झाला आहे. त्यामुळे अनेकांना शंका असून हा अपघात कि घातपात ? याची शंका आता व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे शिवसैनिक, आमदार योगेश कदम समर्थकांनी अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...