आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास कदम यांचे पुत्र अजूनही ठाकरे गटाच्या युवासेनेत:कोअर कमिटीत स्थान, हकालपट्टी का केली नाही?- सेना नेत्यांचा संतप्त सवाल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे शिंदे गटात गेलेले माजी मंत्री रामदास कदम हे उद्धव ठाकरेंवर रोज टीका करत असताना त्यांचे पुत्र मात्र अजूनही ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कोअर कमिटीत असल्याचे समोर आले आहे.

कोअर कमिटीच्या कार्यकारिणीत

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर रामदास कदम आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र आमदार योगेश कदम हे शिंदे गटात गेले आहेत. मात्र, रामदास कदम यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश रामदास कदम अजूनही शिवसेनेच्या युवा सेनेच्या कोअर कमिटी कार्यकारिणीत आहेत. यावर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

विभाग प्रमुखांचा सवाल

दसरा मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी काल शिवसेना भवनात ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई, मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. याच बैठकीत चर्चा करत असताना सिद्धेश कदम अजूनही युवा सेनेच्या कार्यकारिणीत असल्याचे समोर आले. त्यावर सिद्धेश कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारिणीत कसे? असा प्रश्न विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी केला.

ठाकरेंना विचारुन निर्णय घेऊ

सिद्धेश कदम युवा सेनेच्या कोअर कमिटीत असल्याचे समजताच शिवसेना नेते अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनीही आश्चर्य व्यक्त केले. तसेच, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना याबाबत जाब विचारला? यावर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी यावर लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून निर्णय घेऊ, से उत्तर दिले. हे उत्तर एकूण विभाग प्रमुख आणखीच भडकले.

हकालपट्टी का केली नाही?

विभाग प्रमुखांनी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली, सध्या रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम रोज ठाकरे गटावर जहरी टीका करत आहेत. अशावेळी रामदास कदम यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम युवासेनेत अजून कसे काय कार्यरत आहेत? त्यांची हाकालपट्टी अजून का केली नाही?, असा संतप्त सवाल विभागप्रमुखांनी केला.

शिंदे गटात युवा सेनेची बांधणी

उद्धव ठाकरे गटाप्रमाणे शिंदे गटातही युवा सेनेची बांधणी सुरू आहे. शिंदे गटाच्या युवा सेना प्रमुखपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी राज्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, स्थानिक संघर्षामुळे अनेक ठिकाणी कार्यकारिणी ठरत नसल्याचे समोर येत आहे. याबाबत अंतिम निर्णय ठाण्यातूनच होईल, असे म्हटले जात आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला युवा सेनेकडून कोण जास्त कार्यकर्ते नेतो यावर हा निर्णय अवलंबून असेल, अशीही चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...