आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनसनाटी:हिरेन हत्या प्रकरणावरून रणकंदन; 4 तासांत 8 वेळा विधानसभा तहकूब

मुंबई / मनाेज व्हटकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सचिन वाझे यांनीच व्यापारी मनसुख हिरेन यांची हत्या केली : फडणवीसांचा आरोप

मुंबईतील व्यापारी मनसुख हिरेन हत्या आणि अन्वय नाईक, भाजप खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणांवरून मंगळवारी विधानसभेत रणकंदन झाले. मनसुख हिरेन यांची हत्या मुंबईचे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनीच केल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते देेेवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सत्ताधारी आणि आघाडी सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप फैरी आणि घोषणाबाजीने सभागृह दणाणले. दुपारी १२ ते ४ अशा पावणेचारपर्यंत ८ वेळा आणि अखेर दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी आठव्या वेळेस दिवसभरासाठी कामकाज तहकूब झाले.

मुंबईचे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा थेट आरोप करून वाझे यांना तत्काळ अटक करून निलंबित करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. यानंतर भाजप आमदारांनी एकदम आक्रमक पवित्रा घेत ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. शिवसेनेशी संबंधित वाझे यांच्यावर हत्येचा आरोप झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री अनिल परब व नंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक, खासदार मोहन डेलकर यांच्या आत्मत्येप्रकरणी तपास करण्याची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरून घोषणायुद्ध सुरू झाले. दरम्यान, दादरा-नगर हवेलीचे खासदार डेलकर यांची पत्नी आणि मुलाने सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान भवनात भेट घेतली.

वाझे यांना अटक करून तत्काळ निलंबित करण्याची मागणी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली होती. ती मनसुख हिरेन यांची होती. त्यांचे व वाझे यांचे निकटचे संबंध होते. हिरेन यांची हीच कार वाझे यांनीही काही दिवस वापरली होती. ते दोघे एकत्र फिरत होते. मनसुख यांची हत्या वाझे यांनीच केली आहे, असा जबाब हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांकडे दिला असून त्यांना अटक करा व प्रकरणी गृहमंत्र्यांनी निवेदन करावे, अशी मागणी फडणवीस यांनी लावून धरली.

सीडीआर फडणवीस यांच्याकडे कसा : नाना पटाेले
अंबानी यांच्या घरासमाेर केंद्र, राज्य व इतर असा तीनस्तरीय बंदाेबस्त असताना कार तेथे पार्क झालीच कशी? या प्रकरणाचा सीडीआर फडणवीस यांच्याकडे कसा? याप्रकरणी काहीतरी गाैडबंगाल आहे, असा संशय व्यक्त करून नाना पटोले यांनी भाजपलाच आराेपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला. यानंतर फडणवीस तत्काळ सीडीआरप्रकरणी चाैकशी करा, असे आव्हान दिले.

डेलकर आत्महत्येची एसआयटी चौकशी
फडणवीस व भाजप आमदारांनी सरकारला व गृहमंत्र्यांना लक्ष्य केल्याचे पाहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही विराेधकांना कडक शब्दांत सुनावण्याचा प्रयत्न केला. फडणवीस सरकारने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास हाेऊच दिला नाही. अन्वय नाईकच्या पत्नी व मुलीने तक्रार केली हाेती, असा आरोप गृहमंत्र्यांनी केला. दरम्यान, भाजप खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची घोषणा देशमुख यांनी केली आहे.

सभागृहामध्ये अभूतपूर्व गदारोळ
सत्ताधारी-विरोधकांचे घोषणायुद्ध : सभागृहात निवेदन करण्याच्या फडणवीस यांच्या मागणीनंतर भाजप आमदारांनी जोरदार घाेषणाबाजी सुरू ठेवली. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेना व आघाडीच्या सदस्यांनीही केंद्रातील सरकारविराेधात घाेषणाबाजी सुरू केली. सभागृहात बराच वेळ मनसुख हिरेनप्रकरणी व माेहन डेलकर आत्महत्या तपासाच्या मागण्या परस्परांकडून हाेत हाेत्या. एकीकडून “ठाकरे सरकार खुनी है’ आवाज येत हाेता, तर दुसरीकडून “अमित शहा खुनी है’ असा आवाज येत हाेता.

शिवसेना सचिन वाझेंच्या पाठीशी; परब, भास्कर जाधवांचे प्रत्यारोप
या सर्व गाेंधळात संसदीय कार्यमंत्री अनिल परब, भास्कर जाधव यांनी भाजपवर पलटवार केला. पत्रकार अर्णब गाेस्वामीला वाझे यांनी उचलून आणले होते, तेच या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यामुळे वाझेंवर भाजपचा राग असून वाझे यांनी तपास केल्यास भाजप अडचणीत येईल म्हणून भाजप टीका करीत असल्याचा उलट आरोप परब यांनी केला. गृहमंत्र्यांनीही या सुरात सूर मिसळला. खासदार डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणीही चाैकशी करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी लावून धरली. यानंतर सभागृहातील गोंधळ टिपेला पोहोचला.

बातम्या आणखी आहेत...