आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतसिंह प्रकरण:राणे कुटुंबीयांकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न, दीपक केसरकर यांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरे यांच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत पंतप्रधान मोदी यांना माहिती देण्यात आली. तेव्हा मोदींनी कुटुंबप्रमुख कसा असावा हे दाखवून दिले, असे वक्तव्य एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी करून खळबळ उडवून दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना केसरकर म्हणाले की, सुशांतसिंह राजपूत प्रकरण जेव्हा महाराष्ट्रात घडले तेव्हा आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. ती बदनामी करण्यामध्ये आताचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्या पत्रकार परिषदा घेतल्या त्याचा मोठा वाटा होता. आमच्यासारखे लोक, जे ठाकरे कुटुंबावर प्रेम करतात तेसुद्धा यामुळे दुखावले गेले होते. पुढच्या काळात उद्धव साहेबांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली आणि मला उद्धव साहेबांच्या आणि पंतप्रधान मोदींच्या बोलण्यातून जे काही समजत होते ते खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख कसा असावा, हे पंतप्रधान महोदयांनी दाखवून दिले. तसेच मोदींशी संबंध जपण्याची ठाकरेंनी तयारीही दाखवली होती. १२ आमदारांचे निलंबन झाले तेव्हा भाजपसोबत बोलणी सुरू होती. नारायण राणेंचा त्याच वेळी केंद्रात समावेश झाला. राणे केंद्रात गेल्याचे ठाकरेंना आवडले नाही आणि बोलणी रखडली, असेही केसरकर म्हणाले.

मला बदनामी करायची नाही : केसरकर म्हणाले की, मला खोटे बोलून कुणाचीही बदनामी करायची नाही. जे काही घडले होते तसेच्या तसे मी महाराष्ट्रासमोर आणले. या सगळ्या गोष्टीत खूप वेळ गेला आणि दरम्यानच्या काळात १२ लोकांचे निलंबन झाले.. निलंबन झाल्यावरही भाजपकडून निरोप आला होती की, आपली बोलणी चालू आहेत. असे निलंबन आणि एवढ्या काळासाठी करणे योग्य नाही, अशी माहितीही केसरकर यांनी दिली.

मी बोललेले खोटे निघाल्यास सार्वजनिक क्षेत्रातून संन्यास मी जे बोललो ते खरे आहे. यातला एक शब्द जरी खोटा निघाला तर सार्वजनिक क्षेत्रातून संन्यास घेईन, असे केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून भीती आहे. तरी ते लोकांबरोबर जातात. लोकांना भेटतात. त्यामुळे आमची काळजी वाढली असल्याचे एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, असेही केसरकर म्हणाले.

राणे विरुद्ध ठाकरे वाद पेटण्याची शक्यता केसरकरांनी राणे कुटुंबाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राणे विरुद्ध ठाकरे यांच्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. तर राणे पिता-पुत्रांकडून केसरकर यांच्या या वक्तव्यावर काय प्रत्युत्तर दिले जाते हेही पाहणे महत्त्वाचे आहे. राणे पिता-पुत्रांनी यापूर्वीही अनेकदा ठाकरे पिता-पुत्रांवर टीका केल्यानंतर दीपक केसरकर यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे राणे काय भूमिका घेतात, हेही महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...