आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात वक्तव्य:राहुल गांधींनी माफी मागावी, अन्यथा गुन्हा दाखल करेल- रणजीत सावरकरांचा इशारा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अवमानजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे राहुल गांधींनी माफी मागावी. अन्यथा मी याविरोधात पोलिसांत FIR दाखल करेल, असा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी दिला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरेंनी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे राहुल गांधींना सुनावले आहे. तर, भाजप व शिवसेनेने उद्धव ठाकरे नौटंकी करत असून हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसला सोडावे, असे आव्हान दिले आहे. आता या वादात वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनीही उडी घेतली आहे.

उद्धव ठाकरेंनी माफी मागायला लावावी

आज पत्रकार परिषदेत रणजीत सावरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आदर आहे. पण, केवळ असे बोलून भागणार नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर केवळ नाराजी व्यक्त करुन चालणार नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राहुल गांधींशी चर्चा करावी आणि राहुल गांधींना आपल्या वक्तव्याबाबत माफी मागायला लावावी.

काँग्रेसचे सातत्याने सावरकरविरोधी वक्तव्ये

पुढे रणजीत सावरकर म्हणाले, वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी व काँग्रेसला दिला आहे. मात्र, असे असूनही काँग्रेस नेत्यांचे सावरकरविरोधी वक्तव्य थांबलेले दिसत नाही. उद्धव ठाकरेंचीही काँग्रेससोबत आघाडी कायम आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनीच राहुल गांधींशी चर्चा करावी व त्यांना माफी मागायला लावावी.

शरद पवारांनी केवळ सूचना करू नये

दुसरीकडे, काल विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सावरकरांच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. सावरकर व आरएसएस यांचा काहीही संबंध नाही. सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, असे शरद पवारांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत सांगितले आहे. त्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी संवेदनशील मुद्यांवर यापुढे न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. यावर रणजीत सावरकर म्हणाले की, शरद पवार यांनाही स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आहे. मात्र, केवळ सूचना करुन त्यांनी थांबावे. माफीवीर वक्तव्याबाबत शरद पवारांनी राहुल गांधींना माफी मागायला लावावी.

मुस्लीम मतांसाठी राहुल गांधींचे वक्तव्य

राहुल गांधींवर टीका करताना रणजीत सावरकर म्हणाले की, राहुल गांधी केवळ राजकीय फायद्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करत आहेत. मुस्लीम मतांच्या लांगुलचालनासाठी राहुल गांधी सावरकरविरोधी वक्तव्य करत आहे, हे पाहून वाईट वाटते. महाराष्ट्रातही सावरकरांच्या नावाने आता राजकारण केले जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी करू नये, असे आवाहनही यावेळी रणजीत सावरकरांनी केले.

संबंधित वृत्त

आघाडीतील बिघाडी रोखण्याचे प्रयत्न:सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, राहुल गांधींच्या उपस्थितीत शरद पवारांनी मांडली भूमिका

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएस यांच्यामध्ये संबंध नाही. सावरकर यांना माफीवीर म्हणणेही योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या बैठकीत मांडली आहे. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. बैठकीत सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्द्यांवर चर्चा करूयात, असे आवाहनही शरद पवारांनी केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शरद पवारांच्या या मताला मित्र पक्षातील अनेक खासदारांनी सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनीही मी शरद पवारांच्या मताचा मी आदर करतो, असे म्हटले आहे. त्यामुळे यापुढे राहुल गांधी आणि काँग्रेस सावरकरांचा मुद्दा टाळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वाचा सविस्तर