आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी संसदेबाहेर लावा, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करून आधीच पेटलेल्या वादात तेल ओतले आहे. तर संजय राऊत यांनी तारतम्य ठेवून बोलावे, असा इशारा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला आहे.
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा प्रश्न प्रथमतः उपस्थित केला. आता त्या वादात ठाकरे गटाने उडी घेतली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. मात्र, लोकांनी त्यांना डिग्री पाहून निवडून दिले नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या मतापासून अंतर राखले आहे.
काय म्हणाले राऊत?
संजय राऊत म्हणाले की, आमची डिग्री जनतेसमोर आहे. राष्ट्रपतींची डिग्रीही आम्ही मागू शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची डिग्री आम्ही मागू शकतो. पंतप्रधानांची डिग्री लपविण्याचे कारण काय आहे? मला वाटते पंतप्रधानांनी स्वतः समोर येऊन स्वतःच्या डिग्रीबद्दल खुलासा करावा. नव्या संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही डिग्री लावली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
निर्णय मान्य करा
पंतप्रधानांच्या संदर्भात वक्तव्य करताना संजय राऊत यांनी थोडे तरी तारतम्य ठेवले पाहिजे, असे उत्तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. दानवे म्हणाले, जेव्हा एखादा विषय सार्वजनिक होतो. मात्र, त्याचा सार्वजनिकरित्या त्याचा निर्णय होत नसेल, तर अशा प्रकारचे विषय कोर्टात जातात. कोर्ट जो निर्णय देईल, तो निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागतो. हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. न्यायालयाने स्पष्टपणे निकाल दिलेला आहे.
कोर्टावर भरोसा नाही
रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, मात्र, आज-काल न्यायसंस्थेवर सुद्धा यांचा भरोवसा राहिलेला नाही. कुठल्याच कोर्टाच्या निकालावर हे भरोसा ठेवायला तयार नाहीत. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भरोसा ठेवायला तयार नाहीत. एका बाजूला घटना बचावची गोष्ट करतात. दुसऱ्या बाजूला कोर्टाचा निकाल मान्य करत नाहीत. मला असे वाटते की, संजय राऊत यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही.
मोदींनी करिश्मा निर्माण केला
राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या विषयापासून चार हात दूर राहणे पसंद केले. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना २०१४ मध्ये त्यांची डिग्री बघून लोकांनी निवडून दिले आहे का? जो भारतीय जनता पक्ष काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत नव्हता, तो त्यांनी नेला. त्याचे सर्वस्वी श्रेय नरेंद्र मोदी यांनाच दिले पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये स्वतःचा करिश्मा निर्माण केला. देशाचे आतापर्यंत अनेक पंतप्रधान, मुख्यमंत्री झाले. या लोकशाहीत त्यांना बहुमताचा आदर करून महत्त्व आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.