आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:विषाणूमध्ये वेगाने होतोय बदल; पोटरी, पाठदुखी, डायरिया कोरोनाची नवी लक्षणे, कृती दलाच्या वैद्यकीय परिषदेत डॉक्टरांचा सावधगिरीचा सल्ला

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृती दलाच्या वैद्यकीय परिषदेत डॉक्टरांचा सावधगिरीचा सल्ला

कोरोना विषाणूत बदल होत असून डेल्टाचा फैलाव वेगाने होत आहे. त्याचप्रमाणे कोविडची विविध लक्षणे आढळून येत आहेत. त्यात काही रुग्णांमध्ये पोटरीची स्नायूदुखी, पाठदुखी, डायरिया, उलटी होण्याची लक्षणेही दिसत आहेत. त्यामुळे कोरोना होऊन उपचार करण्यापेक्षा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याचा सल्ला रविवारी ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत तज्ज्ञांनी दिला. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आयोजित केलेल्या ऑनलाइन वैद्यकीय परिषदेचे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने उद्घाटन झाले. त्यात वैद्यकीय तज्ज्ञांनी आपली निरीक्षणे नोंदवली. कोरोना संपला असे वाटायला लागले म्हणून अनेक लोक मास्क वापरत नाहीत.

सण, उत्सव, विवाह, पार्टी सोहळे मोठ्या संख्येने करत आहेत. विषाणूमध्ये बदल होत असून डेल्टाचा फैलाव वेगाने होतो आहे. डेल्टानंतर कोलंबियामध्ये नवा स्ट्रेन आढळून आला आहे, अशी माहिती हार्वर्ड विद्यापीठाचे तज्ज्ञ मेहुल मेहता यांनी दिली. कोविडची विविध लक्षणे आढळत असून काही रुग्णांना चव आणि वास येत नाही. पोटरीचे स्नायू आणि पाठदुखी वाढली, डायरिया, उलटी होण्याची लक्षणे दिसत आहेत. त्रास झाला किंवा कोणतीही लक्षणे दिसली तर ‘कोविड नाही ना?’ हा प्रश्न प्रत्येक डॉक्टर्सने आणि सुजाण नागरिकाने आपल्या मनाला विचारावा असा सल्ला कोरोना कृती दलाचे अध्यक्ष संजय ओक यांनी दिला.

आईला कोविड असल्यास नवजात शिशूची कोरोना चाचणी गरजेची : आईला कोविड असेल तर नवजात शिशूची आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. ज्या मुलांमध्ये संक्रमण झाले तर त्याची तीव्रता सर्वसाधारणपणे सौम्य असते, त्यांच्यावर घरीही उपचार करू शकतो. गंभीर लक्षणे असे सांगून या आजारामुळे मुलांना मानसिक त्रास होऊ नये याकरिता त्यांच्याशी संवाद साधणे अधिक गरजेचे आहे, असे बालकांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनी स्पष्ट केले.

अशी घ्या काळजी
रोज मास्क बदला, ओला झालेला मास्क कधीही लावू नका. ऑक्सिजनचे प्रमाण ९३ पेक्षा कमी झाल्यास पोटावर झोपा, त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. नव्या लक्षणांवर लक्ष ठेवा. लक्षणे दिसताच तत्काळ चाचण्या करून घ्या, असा सल्ला डाॅ. राहुल पंडित यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...