आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बूमरँग:रश्मी शुक्लांनीच फोडला फोन टॅपिंगचा अहवाल; आता कारवाईचे ‘शुक्लकाष्ठ’;दहशतवादाचे कारण सांगून घेतली परवानगी अन् खासगी व्यक्तींवर निगराणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बनवाबनवी उघड होताच मुख्यमंत्र्यांची माफी मागितली, नंतर पुरवला ‘डेटा बॉम्ब’

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली. मात्र प्रत्यक्षात खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ही बाब उघड होताच शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागितली. तसेच फोन टॅपिंगचा अहवाल परत घेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र हा अत्यंत गोपनीय अहवाल शुक्ला यांनीच फोडला, असा संशय असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अाता शुक्ला यांच्यामागेच चौकशीचे ‘शुक्लकाष्ठ’ लागण्याची शक्यता आहे.

राज्यात पोलिस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असून त्यासंदर्भात गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालाने गेला आठवडाभर खळबळ माजलेली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल सार्वजनिक करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

बदल्यांची वस्तुस्थिती
१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या काळात “भापोसे’च्या १६७ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. ४ अपवाद वगळता सर्व पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारशीवर झाल्या होत्या.
-सप्टेंबर २ ते २८ आॅक्टोबर २०२० दरम्यान १५४ बदल्या झाल्या. पैकी १४० बदल्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीने तर १० पदस्थापनेतील बदल सुचवून झाल्या.
-३१ मार्च २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात राज्य सेवेतील ८३ पोलिस अधीक्षकांच्या, १८६ उपअधीक्षकांच्या, ९६ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यातील ९ बदल्या वगळता सर्व आस्थापना मंडळाच्या शिफारशीने झाल्या आहेत.

राज्य शासनाला क्लीन चिट
शुक्ला यांनी ज्यांचे फोन टॅप केले त्यांची, तसेच त्यात ज्या आयपीएसची नावे आहेत त्यांची विनाकारण बदनामी झाली. शुक्लांंच्या अहवालात नमूद अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय शासनाने प्रत्यक्षात घेतलेलेच नाहीत. त्यामुळे शुक्ला यांच्या अहवालातून शासनाने कोणतेही गैरकृत्य केल्याचे दिसून येत नाही, अशी क्लीन चिट या अहवालात मुख्य सचिवांनी दिली आहे.

कठोर कारवाईचे संकेत
रश्मी शुक्ला यांनीच इतक्यात हा अहवाल उघड केला. या अहवालाची प्रत शुक्ला यांच्याकडची असावी. मात्र टाॅप सिक्रेट कागदपत्रे उघड करणे गंभीर बाब आहे. शुक्ला यांनी अहवाल उघड केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांना या अहवालात मुख्य सचिवांनी सूचित केले आहे.

अहवाल मुख्यमंत्र्यांना माहिती : शुक्ला यांनी जुलै २०२० मध्ये फोन टॅप केले. तो अहवाल पोलिस महासंचालकांना २५ आॅगस्टला दिला. २६ आॅगस्टला गृह सचिवांना प्राप्त झाला. मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी तो तपासून मागितला. त्या अहवालात गंभीर बाब आढळून येत नाही. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि वस्तुस्थिती पूर्ण भिन्न आहे, असा अभिप्राय देऊन तत्कालीन अतिरिक्त गृह सचिव सीताराम कुंटे यांनी तो मुख्यमंत्री ठाकरे यांना ३१ आॅगस्ट रोजी सादर केला होता.

चुकीची कबुली, अहवाल परत घेण्याची विनंती : शुक्ला यांनी बेकायदा फोन टॅप केल्याचे उघड होताच मुख्यमंत्री यांच्याकडे चूक कबूल केली होती. पतीचे कर्करोगाने निधन झाले आहे. मुले शिकत आहेत. मी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे, अशी कारणे देऊन माफीची विनंती केली. तसेच फोन टॅपिंगचा स्वत:चा अहवाल परत घेण्याची विनंती केली. महिला अधिकारी असल्याने मुख्यमंत्र्यांनी कारवाई न करता शुक्ला यांना माफी दिल्याचे अहवालात म्हटले आहे.

सार्वजनिक सुरक्षेस धोका असल्याचे कारण
रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेस धाेका असल्याचे कारण देत फाेन टॅपिंगची सरकारकडे परवानगी मागितली. विभागाने ती दिली. मात्र दिशाभूल करत शुक्ला यांनी खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. त्यानंतर शुक्ला यांच्याकडून आघाडी सरकारने स्पष्टीकरण मागितले होते, असे कुंटे यांच्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, शुक्ला यांच्या फुटलेल्या अहवालाचे संतप्त पडसाद बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटले होते. त्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्य सचिव कुंटे यांना याप्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

बातम्या आणखी आहेत...