आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुठल्याही रूढ धर्माचा पुरस्कार न करता धार्मिकतेची अत्यंत खोल अशी वैयक्तिक अनुभूती ज्यांनी स्वाभाविक अंत:प्रेरणेने घेतली असे संत म्हणजे कबीर. ईश्वरनिष्ठा, सदाचरण, प्रेम,अहिंसा ही सर्व मूल्ये कबीरांच्या कवितेत ठायी ठायी व्यक्त होताना दिसतात. त्यांची जीवनदृष्टी आपल्या भ्रांतिमय जीवनात उजेड सांडणारी आहे. ईश्वरनिष्ठेतून म्हणजेच आध्यात्मिक तळमळीतून समतेची जाणीव निर्माण करता येते, हे समर्थपणे सूचित करणारी कबीरांची जीवनदृष्टी आपणास हेही सांगते की, समाजमान्य गोष्टींना केलेला विरोध ही केवळ नकाराची प्रतिक्रिया नसते, तर तो एक विधायक उद्गार असतो. कबीरांचा एकेक दोहा चिंतनात उतरवला की त्यांच्या या दृष्टीची आपल्याला प्रचिती येते.
आपण जे सांगतो आहोत, ते केवळ पुस्तकांवर वैचारिक गुजराण केलेल्या पंडितांचे अनुभूतिशून्य, पोकळ ग्रांथिक आकलन नव्हे, याची स्पष्ट जाणीव कबीरांना आहे. म्हणूनच ते साध्या आणि काळजाचा तळ गाठणाऱ्या शब्दांत, शब्दांनाच प्रमाण मानणाऱ्या तथाकथित विद्वानांना उद्देशून म्हणतात..
मैं कहता हौं आँखिन देखी, तू कहता कागद की लेखी रे।
मैं कहता सुरझावनहारी, तू राख्यो उरूझाई रे।।
‘जे मी प्रत्यक्ष अनुभवतो, डोळ्यांनी पाहतो ते तुम्हा साऱ्या ग्रंथांच्या वाचकांसाठी फक्त पुस्तकी बडिवार आहे. मी सरळसाधं अनुभवकथन करतो आणि तुम्ही मात्र प्रचलित ग्रंथांतल्या संदर्भांनी गोंधळून जाता.’ कबीरांच्या या अभिव्यक्तीतून आपल्याला जाणवणारा आत्मविश्वास पारंपरिक घोकंपट्टीतून किंवा पोथीनिष्ठेतून निर्माण झालेला नाही; तो त्यांच्या अंतःकरणातून झुळझुळणारा साक्षात्काराचा झरा आहे.
मसि कागद छुयो नहीं, कलम गही नहि हाथ।
चारिउ जुग की महातम, मुखहिं जनाई बात।।
‘मला कागदाचा, शाईचा स्पर्श झाला नाही. मी कधी लेखणी हातात धरली नाही. चारी युगांतील महत्त्वाच्या गोष्टी मी माझ्या मुखातून सांगितल्या आहेत.’
कबीरांचा हा आध्यात्मिक धारणेतून जन्मलेला काव्यात्म उद्गार पुस्तकांचा स्पर्शही न झालेल्या माणसांच्या मनांना खूप जवळचा वाटणारा आहे. पुस्तकांचं, पुस्तकांच्या पानापानांतून लाभणाऱ्या शिकवणीचं महत्त्व व्यवहारी जगासाठी, भौतिक दळणवळणासाठी आहेच. कबीर पुस्तकांचे विरोधक नाहीत, शिक्षणाचे विरोधक नाहीत, ज्ञानाचे तर नाहीतच. तरीही त्यांना प्रत्येक संवेदनशील माणसानं शब्दसंग्रहावर अवलंबून राहावं, त्यांनाच प्रमाण मानून रोजचं संघर्षमय जीवन जगावं, हे रुचत नाही.
जगण्यासाठी आपला अनुभवच प्रमाण मानून प्रत्येकानं धर्मशील व्हावं, हे कबीरांना मांडायचं आहे. ईश्वर, अध्यात्म, भक्ती, ज्ञान या अनुभूतीच्या गोष्टी आहेत. त्या पोथ्यांतले शाब्दिक पांडित्य उगाळून हाती येणाऱ्या गोष्टी नव्हेत. कबीरांना वाटते की, उलट या पोथीपांडित्याने अहंकार वाढतो व ईश्वर दुरावतो.
रोजच्या जगण्याच्या धावपळीत आपण आपल्या मनाच्या स्थितीपाशी, परिस्थितीच्या एखाद्या थांब्यापाशी पळभर तरी थांबतो का? आपली धाव कशासाठी असते, त्यामागचा हेतू कळावा एवढी स्वस्थता तरी आपल्या मनाला असते का? मग आपल्यासाठी जगणं म्हणजे काय असतं? धावाधाव करणाऱ्या मनाला ज्ञान तरी कशाचं होणार, अनुभूती तरी कुठली येणार? आणि ती व्यक्त करण्यासाठी स्वतःची शब्दशक्ती तरी कशी जागवता येणार?
कागद - लेखणीचा स्पर्शही न झालेले कबीर समोर जमलेल्या गरीब, निरक्षर श्रोत्यांचे अंत:करण जाणतात. परांतर जाणल्याची अनुभूती साध्या-सरळ अंत:करणातून मांडतात. या मांडणीमुळं कबीर त्यांना जवळचे वाटतात. अनावश्यक नोंदींचा मनाला भार झालेल्या, ग्रांथिकतेचं मूल्य जाणणाऱ्या सुजाण वाचकालाही ते आपले वाटतात.
आपण उद्गारलेल्या आणि दुसऱ्यानं उच्चारलेल्या शब्दांपेक्षाही आध्यात्मिक जगण्यात आपली स्वतःची अनुभूती प्रमाण असते. शब्द हे स्वतःला व्यक्त करायचं एक साधन असतं. ते कधीच अनुभूतीचा संपूर्ण आशय असू शकत नाहीत. अनुभूती ही ज्याची त्याची असते. कबीरांच्या मनात असा भाव असावा की, ही अनुभूती एखादा निरक्षर माणूसही घेऊ शकतो. कारण तो शब्द, संज्ञा, प्रतिमा यांच्या संस्कारांनी अधिक बांधलेला नसण्याची शक्यता असते. कबीरांच्या समोर बसून त्यांचे भजन - प्रवचन ऐकणाऱ्या निरक्षर श्रोत्यांच्या मनात त्यांनी हे पुस्तकी, अहंकारी पांडित्य झाडून टाकून अनुभूतीची स्थापना केली. प्रेमासारखी तरल अनुभूतीही वैचारिक-बौद्धिक होण्याचा हा काळ आहे.
शाब्दिक देवघेवीतून प्रेम आपल्या ठायीची चेतना उंचावतं, असं गृहीतक शिकल्या-सवरल्या मनांमध्ये अगदी ठाम होत आहे. प्रेमाच्या भावप्रदेशातही पुस्तकी-पंडितांची मुशाफिरी पुष्कळ वाढीस लागली आहे. अनुभूती हा देहा-मनाचा विषय आहे की त्यापलीकडचा, याचा अंतर्शोध कबीरांच्या दोह्यातून घेता येतो. त्यांच्या शब्दांच्या आधारानं अनुभवकाची स्थिती हृदयाच्या निवांतपणातून जाणता येते. संपर्क : 9403768891 _photocaption_कबीररंग*photocaption* हेमकिरण पत्की hemkiranpatki @gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.