आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रोखठोक राऊत:ऑक्टोबरपर्यंत वाट्टेल ती किंमत मोजून सरकार पाडण्याच्या पैजा लागल्या, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे, संजय राऊतांचा घणाघात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरून भाजापावर घणाघाती टीका केली आहे.

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्त्या सध्या रखडलेल्या आहेत. या नियुक्त्यांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. वाट्टेल ती किंमत मोजून सरकार पाडण्याच्या खाली खेचण्याच्या पैजा लागलेल्या आहेत. सरकार पाडल्यानंतर आपल्या मर्जीतील सदस्यांची नियुक्ती भाजपला करायची आहे. याच कारणामुळे या नियुक्त्या रखडल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. दैनिक 'सामना'मधील रोखठोख या सदरातून त्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्त्यांवर भाष्य केले आहे. 

संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणतात की, विधान परिषदेवर राज्यपालांच्या सहीने 12 जणांची नेमणूक होईल, पण सध्याचे राज्यपाल या नेमणुका करण्यास अनुकूल नाहीत असे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध झाले. ते चिंताजनक आहे. सरकारने 12 सदस्यांच्या शिफारसी केल्या तरी राज्यपाल या शिफारसींवर तत्काळ सही करणार नाहीत. पुढील दोन महिने म्हणजे सप्टेंबरपर्यंत सरकारने केलेल्या शिफारसी राज्यपाल मान्य करणार नाहीत. 15 जूनला सर्व 12 सदस्यांची मुदत संपली व या जागा रिक्त झाल्या. त्या तत्काळ भरल्या तर नवे सदस्य कामाला लागतील. आमदार म्हणून ते महाराष्ट्राची सेवा करतील, पण सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नामनियुक्त आमदारांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी सरकारला दिले आहेत. हे खरे असेल तर 12 सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरचाच महिना कशासाठी? यावर बाहेर अशा पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्राचे सध्याचे सरकार पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. नंतर येणारे सरकार नामनियुक्त 12 जणांच्या नेमणुका करेल, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही. या राजकारणात राज्यपाल नावाची घटनात्मक संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे! असे राऊत म्हणाले. 

...ही स्वातंत्र्याची मुस्कटदाबीच ठरेल
 पुढे संजय राऊतांनी म्हटले की, श्री. शहा म्हणतात, ‘‘आणीबाणी ही एका कुटुंबाच्या सत्तेची भूक होती. स्वातंत्र्याची मुस्कटदाबी आणि घुसमट होती. घटनेची पायमल्ली आणीबाणीत झाली.’’ श्री. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. घटना व स्वातंत्र्याची, संसद आणि विधिमंडळाची आणीबाणीप्रमाणे मुस्कटदाबी होऊ नये असे गृहमंत्री सांगतात, त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. राज्यपालांना हा स्पष्ट संदेश आहे. 12 सदस्यांच्या नियुक्त्या वेळेत न करणे ही आणीबाणीप्रमाणे विधिमंडळ व स्वातंत्र्याची मुस्कटदाबीच ठरेल!

0