आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचा पत्रकाद्वारे भाजपला इशारा:'चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांची जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करू'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एक पत्रक जारी करत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांबद्दल करण्यात आलेल्या ट्विटवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच भाजपने पवारांची माफी मागावी, नाहीतर कायदेशीर कारवाईला समारे जावे, असा इशारा दिला आहे. भाजपने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ शेअर करत टीका केली होती. पवार नेहमीच हिंदूंचा द्वेष करतात. नास्तिक शरद पवारांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत, अशा शब्दात भाजपकडून टीका करण्यात आली होती.

जाणीवपूर्वक हिंदू विरोधी प्रतिमा निर्माण करुन पवारांचा अपमान करणारे ट्विट भाजपने केले आहे. भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पवारांना जाणीवपूर्वक हिंदू धर्म विरोधी ठरविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. अर्धवट ज्ञान असणारा भाजप पक्ष व त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शरद पवारांबद्दल खोटी माहिती पसरवत आहेत. हे ट्विट आक्षेपार्ह आहे. ते भाजपाने ट्विटर हॅण्डलवरुन काढून टाकावे आणि भाजप आणि चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांची जाहीरपणे माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा रविकांत वरपे यांनी दिला आहे.

सत्तेसाठी हपापलेले भाजप -

वरपे पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी कधीही कोणत्याही जाती धर्माचा अपमान होईल, अशी कृती केलेली नाही. हिंदू देव देवतांचा अपमान केलेला नाही. उलट हिंदू धर्मातील देवदेवतांचा आदर करत आल आहेत. कित्येक हिंदू दवतांच्या मंदिरांचा पवार यांनी जीर्णोद्धार केलेला आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. पण महाराष्ट्रात काहीही करुन तेढ निर्माण करुन सत्तेसाठी हपापलेले भाजपाचे नेते पवारांना हिंदू विरोधी ठरवून खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत.

पवार यांनी कधीही हिंदू धर्माचा अपमान केलेला नाही

भाजपला टोला लगावत वरपे म्हणाले की, पवारांनी आपल्या भाषणात ज्या कवितेचा उल्लेख केला ती कवी जवहार राठोड यांच्या काव्यसंग्रहातील ‘डोंगराचे ढोल’ ही कविता होती. यात पाथरवट समाजाचे जीवन, वंचित, उपेक्षित समाजाची व्यथा मांडलेली आहे. समाजाचे दु:ख कविता, लेखांच्या माध्यमातून तोच समाज मांडत असेल, तर तो काय हिंदू धर्माचा किंवा देवदेवतांचा अपमान नसतो. त्या समाजाच्या न्याय हक्कासाठी शरद पवार गेली अनेक वर्ष लढत आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्र्ला माहीत आहे. पवार यांनी कधीही हिंदू धर्माचा अपमान केलेला नाही. भाजपा नेते मात्र केवळ अर्धवट माहितीच्या आधारे आम्हीच फक्त हिंदूंचे कैवारी असा आव आणत आहेत. पवारांच्या भाषणातून एक छोटीशी क्लीप काढून हिंदू समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचे काम भाजपा करत आहे. कवी जवाहर राठोड यांच्या कवितेतील पाथरवट या शब्दाला अर्थ असा आहे, की दगडाला आकार देणारा समाज, मूर्ती घडवूनही या समाजाला देवळात जाण्याचा अधिकार नाही. या व्यथा या कवितेतून मांडल्या आहेत. याचाचा उल्लेख पवार यांनी आपल्या भाषणात केला. मात्र भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांना यातही जाती, धर्माचा तिरस्कार दिसला. यावरुन भाजपाच्या नेत्यांच्या बुद्धीची कीव येते.

खोटा इतिहास सांगणे भाजपची संस्कृती -

वरपे पुढे म्हणाले की,भाजपा समाजातील प्रत्येक माणसाकडे तो कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा आहे याच दृष्टीने पाहत आलेला पक्ष आहे. पवारांवर ते नास्तिक असल्याचा सातत्याने आरोप भाजप करत आहे. पण पवार नास्तिक आस्तिक हा विषय बाजूला ठेवून बेरोजगारी, महागाई, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था हे विषय सातत्याने दौरे करुन चव्हाट्यावर आणत आहेत. हे भाजपच्या मनाला लागलेले आहे. म्हणूनच धर्माचा आधार घेऊन भाजपा राजकारण करत आहे. खोटा इतिहास सांगणे अर्धवट अभ्यास करुन चुकीचे बोलणे व समाजामध्ये दिशाभूल करणे ही भाजपची संस्कृतीच आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील व भाजपने आदरणीय शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असा इशारा वरेप यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...