आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Reaction On Budget | Budget: Opponents Said, This Is A Ploy To Win Elections, Ruling Leaders Compared It To 'public Welfare In Immortality'

अर्थसंकल्प - प्रतिक्रिया:विरोधक म्हणाले, हा तर निवडणुका जिंकण्याचा जुमला, सत्ताधारी नेत्यांनी दिली ‘अमृतकाळातील सर्वजनहिताय’ची उपमा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सत्ताधारी भाजप, शिंदे गटाने या अर्थसंकल्पाचे कौतुक केले तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा अर्थसंकल्प कुचकामी असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पातील घोषणा हा निवडणुका जिंकण्याची जुमलेबाजी असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, मुंबईकरांबरोबरच कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांच्याही तोंडाला पाने पुसली आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, या बजेटमध्ये सामान्य माणूस, गरीब माणूस हद्दपार झाला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीसाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही. ग्रामीण भागातून शहराकडे जाणारे लोंढे थोपवण्यासाठी अर्थसंकल्पात काहीच नाही. तर लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पावर विराेधक नाराज
विकासाची सप्तपदी मांडणारा अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. हा अर्थसंकल्प देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमता मुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, ‘हम सब एक है’ या भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प आहे, असेही त्यांनी सांगितले.

गरीब, महिलांसह सर्व घटकांना बळ देणारा अर्थसंकल्प : चंद्रशेखर बावनकुळे
शेतकरी, युवक, उद्योजक, गरीब, मध्यमवर्गीय, महिला अशा सर्व समाजघटकांना बळ देतानाच देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भक्कम पावले टाकणारा अर्थसंकल्प असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. हा अंत्योदयाच्या संकल्पनेनुसार समाजातील शेवटच्या माणसाची काळजी घेणारा आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देऊन सक्षम करणारा आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

सर्वजनहिताय अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस
केंद्रीय अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीचा, शेतकरी, आदिवासी, महिला, मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांचा विचार करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापासून प्रारंभ झालेल्या ‘देशाच्या अमृतकाळातील सर्वजनहिताय’ असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पायाभूत सुविधांना उत्तेजन दिले गेले : मुख्यमंत्री
गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा सर्व घटकांना न्याय देणारा आणि विकास वाटचालीत सामावून घेणारा अर्थसंकल्प असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अर्थसंकल्पात आकड्यांचा खेळ : नाना पटोले
अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही, ही मोदींची कार्यपद्धती आहे. आजचा अर्थसंकल्प याच कार्यपद्धतीचा भाग आहे. यात आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ यापलीकडे ठोस काहीही नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प : अजित पवार
लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे. मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तिकराची मर्यादा वाढवण्याचा दिखावा करण्यात आला आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...