आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 लाखांचं सोनं उंदरानं पळवलं:CCTVची घेतली मदत, पोलिसांनी फिल्मीस्टाइल लावला 10 तोळे सोन्याचा छडा, महिलेला परतही केलं

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका उंदरांच्या ताब्यातून मुंबई पोलिसांनी 10 तोळे सोने जप्त केले आहे. ही विचित्र घटना मुंबईतील दिंडोशी परिसरात घडली. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी उंदीराचा शोध लावला आणि सोन्याने भरलेली दागिण्यांची पिशवी जप्त केली. पिशवीतील सोन्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सोन्याने भरलेली दागिण्यांची पिशवी एका उंदरांकडे कशी गेली. तर झाले असे की, दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आरे कॉलनी परिसरात राहणाऱ्या सुंदरी प्लानिबेल यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी घरात ठेवलेले 10 तोळे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवण्यासाठी त्या निघाल्या. यावेळी त्यांना वाटेत एक भिक्षेकरी स्त्री आणि तिचे मूल दिसले. तेव्हा सुंदरी यांनी वडापाव असलेली पिशवी त्या मुलाला दिली आणि बँकेकडे निघून गेल्या. बँकेत पोहोचल्यानंतर मुलाला दिलेल्या वडापावच्या पिशवीत सोन्याचे दागिने होते, हे त्यांच्या लक्षात आले आणि पायाखालची जमीनच सरकली. त्या लगेच बँकेतून निघाल्या आणि ज्या ठिकाणी आपल्या मुलासोबत भिक्षेकरी महिला बसली होती. तिथे पोहचल्या. पण, तेथून ती महिला निघून गेली होती. यानंतर सुंदरी यांनी लगेच पोलिस स्थानकाकडे धाव घेतली.

दिंडोशी पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख सुरज राऊत यांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. अधिकारी सूरज राऊत यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना घटनास्थळावरून भिक्षेकरून महिला निघून जाताना दिसली. पोलिसांनी महिलेला शोधून काढले आणि वडपावच्या पिशवीबद्दल विचारणा केली. तेव्हा वडापाव सुकलेला होता, म्हणून आपण ती पिशवी कचरागाडीत टाकून दिली, असे त्या महिलेने सांगितले.

फिल्मी स्टाईल घेतला शोध

ही माहिती मिळताच पोलिसांनी भिक्षेकरी महिलेने ज्या ठिकाणी कचरा फेकला होता, त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पिशवी शोधण्यास सुरुवात केली. मात्र, ती तिथे पिशवी सापडली नाही. तेव्हा पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता भिक्षेकरी महिला कचरा पेटीत पिशवी फेकून देताना दिसून आली. पण, त्यानंतर ती पिशवी एक उंदीर जवळच्या नाल्यात घेऊन जात असल्याचेही पोलिसांनी पाहिले. पिशवीतील वडापावसोबत उंदराने 10 तोळे सोनेही नाल्यात नेले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कचरा गाडीजवळ असलेल्या गटारातून सोन्याचे दागिने असलेली पिशवी बाहेर काढली आणि महिलेला दागिने सोपवले. आपले दागिने मिळाल्यानंतर महिलेचा जीव भांड्यात पडला.

बातम्या आणखी आहेत...