आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठा समाजाच्या तरुणांची नोकरभरती, त्याबाबतचे समांतर आरक्षण या विषयांवर आघाडी सरकारकडून युद्धपातळीवर निर्णय घेतले जाणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
मराठा समाजातील तरुणांच्या नोकरभरतीबाबत बुधवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. दोन तास चाललेल्या बैठकीत मराठा समाजाच्या तरुणांसाठी राज्य सरकार नोकरभरतीत अधिक जागा उपलब्ध करून देण्यासाठी सुपर न्यूमररी पद्धतीवर चर्चा झाली. त्यासाठी विधिज्ञ, सरकारी वकील आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसोबत लवकरच चर्चा केली जाणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही धोका होणार नाही यासाठी सरकार अभ्यास करणार आहे. बैठकीस मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, महादेव तांबे, राजेंद्र कोंढरे, वीरेंद्र पवार उपस्थित होते. शैक्षणिक प्रवेशासाठीही विशेष वैकल्पिक पद्धतीचा वापर करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
तत्पूर्वी, सकाळी उपसमिती सदस्यांची बैठक झाली. हा विषय न्यायालयात जाऊनच सुटणार आहे, असे फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणायचे. त्यांची त्या वेळची भूमिका आणि आजची भूमिका यात फरक आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.
विविध नियुक्त्या, समांतर आरक्षणावरही अभ्यास
सन २०१४ आणि त्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांच्या विविध विभागांत झालेल्या नियुक्त्या, तसेच पर्यायी म्हणून समांतर आरक्षण यावरही अभ्यास करून तातडीने निर्णय घेतले जावेत असे या बैठकीत ठरले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.