आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुशखबर:राज्याच्या आरोग्य, ग्रामविकास विभागात जानेवारी अखेरपर्यंत 8 हजार पदांची भरती; जालना, नंदुरबार, नागपूर, पुणे शहरात लसीकरणाचा ‘ड्राय रन’

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून आता नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष दिले जाईल.

नव्या वर्षात राज्याचा आरोग्य विभाग कात टाकणार आहे. गेली अनेक वर्षे विभागाला भासणारा मनुष्यबळाचा दुष्काळ लवकरच संपणार आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभी आरोग्य विभागात मेगाभरती होणार आहे. जानेवारीअखेरपर्यंत आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील ८ हजार रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ देशभर दि. २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली.

कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून आता नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष दिले जाईल. आरोग्य विभागाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावण्यात येणार असून दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे, असे टोपे यांनी सांगितले. आरोग्य विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी गुरुवारी आरोग्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, मागासवर्ग कक्षाचे अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

प्रत्येक केंद्रावर २५ जणांची निवड, प्रत्यक्षात लसीकरण नाही
ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन साइट (आरोग्य केंद्र) निवडण्यात आल्या आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तिन्ही ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही, मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदुरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

आरोग्यमंत्र्यांनी घेतला राज्यभरातील आरोग्य यंत्रणेचा आढावा

आठवडाभरात निवडक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस : जालना, नंदुरबार, पुणे, नागपूर जिल्ह्यांत येत्या आठवडाभरात काही आरोग्य कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना लस द्यावी, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली. लस दिल्यावर त्या व्यक्तीच्या मोबाइलवर लस दिल्याचा मेसेज येईल, त्याचीही रंगीत तालीम केली जाणार आहे. लस दिल्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्रास झाल्यास काय काळजी घ्यावी हे सांगून त्यासाठी उपचार यंत्रणा सज्ज ठेवावी, अशाही सूचना देण्यात आल्या.

आरोग्य विभागातील रिक्त पदे {२,३६३ अ गट { ८,३१ ब गट { ९,८६२ क गट { ४,२८१ ड गट | एकूण १७,३३७

  • राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जून महिन्यात रिक्त पदे भरण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्या घोषणेस सहा महिने झाले तरी याबाबत कुठलीही हालचाल झाली नव्हती.
  • आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार होती. मात्र मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा संघटनांच्या दबावामुळे ही पदभरती थांबवण्यात आली होती.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया तातडीने सुरू करणार

  • कोरोना नियंत्रणात येत असल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. अनेक दिवसांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत, त्या तातडीने कराव्यात. तसेच मोबाइल सर्जिकल युनिट सुरू करावे, असे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले.
  • आरोग्य संस्थेतील स्वच्छता, परिसर स्वच्छता, भोजनाचा दर्जा याकडे विशेष लक्ष द्यावे, असे टोपे यांनी निर्देश दिले. औषध खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळ करण्याचा मानस आहे. त्यासाठी तामिळनाडू व राजस्थानचा तौलनिक अभ्यास करण्यात येणार आहे.

राज्यात पहिले कोविड रुग्णालय औरंंगाबादेत : डॉ. कुलकर्णी

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांचा ‘दिव्य मराठी’च्या वतीने गुरुवारी कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या वेळी सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी यांनी कोरोनाकाळातील अनुभव सांगितले. ते म्हणाले, राज्यात औरंंगाबादेत पहिले कोविड रुग्णालय आम्ही सुरू केले. तसेच कोरोना रुग्ण असलेल्या महिलेची प्रसूती करण्याचे अवघड काम राज्यात औरंगाबादेत प्रथमच करण्यात आले. दरम्यान, कोरोनाकाळात ‘दिव्य मराठी’ने केलेल्या निर्भीड वार्तांकनाचेही त्यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...