आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुलाब चक्रीवादळाचा जोर ओसरला असून औरंगाबादेत बुधवारी सूर्यदर्शन झाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. दरम्यान, गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीने राज्यात सुमारे ७ ते ८ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पुढील आठवड्यातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अोला दुष्काळ जाहीर करण्याबाबत चर्चा केली जाईल, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्याचा पाहणी दाैरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागच्या दोन दिवसांत मराठवाड्यातील १० पैकी ७ जिल्ह्यांत १७० ते १८० मिमी पाऊस पडला आहे. तसेच यंदा पावसाळ्यात तब्बल ४३६ नागरिकांचा बळी गेला. त्यात १९६ नागरिक वीज पडून मृत्यू पावले. सप्टेंबर महिन्यात ७१ लोकांचा जीव गेला असून २६ नागरिक जखमीझाले आहेत. ९६ मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात तब्बल १७ लाख हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले आहे. पैकी ८१ टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. संपूर्ण पंचनामे झाले तर नुकसानीच्या क्षेत्राचा आकडा २२ लाख हेक्टरवर जाईल. तौक्ते चक्रीवादळासाठी २०३ कोटींचा प्रस्ताव केंद्राला पाठवला होता.
जुलैमधल्या पुराच्या नुकसान भरपाईसाठी १ हजार ६७९ कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र केंद्राची काहीच मदत आली नाही, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना गुलाब चक्रीवादळाच्या अतिवृष्टीचा फटका बसला, याची माहिती महसूल यंत्रणेकडून गोळा केली जात आहे. दोन दिवसांत पाऊस थांबल्यावर पालकमंत्री प्रभावित जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्रीसुद्धा मराठवाड्याचा पाहणी दौरा करतील, असे सांगून नुकसानग्रस्त शेतपिकाचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
राज्याची मागणी व केंद्राची मदत
१. निसर्ग चक्रीवादळ : राज्याची मागणी १ हजार ६५ कोटी (केंद्राची मदत २६८ कोटी). २. पूर्व विदर्भ पूर : राज्याची मागणी ९९९ कोटी (केंद्राची मदत १५१ कोटी ) ३. २०२० अतिवृष्टी : राज्याची मागणी ३७ हजार २१ कोटी (केंद्राची मदत ७२९ कोटी) ४. तौक्ते चक्रीवादळ : राज्याची मागणी २०३ कोटी (केंद्राची मदत -प्रतीक्षेत) ५. जुलै २०२१ अतिवृष्टी : राज्याची मागणी १६ हजार कोटी (केंद्राची मदत -प्रतीक्षेत)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.