आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेर मंदिरे उघडणार!:भाविकांना दिवाळी गिफ्ट: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले - ही 'श्रींची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिरांवरून उडाला होता राज्यपाल-मुख्यमंत्र्यांत वादाचा धुरळा

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर १६ नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ही घोषणा केली. कोरोनारूपी नरकासुराने धुमाकूळ घातला असल्याने मंदिरात जाताना मास्क वापरावा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनामुळे मार्चपासून ८ महिने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर पंढरपूरसह शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि इतर तीर्थक्षेत्रांवरही भाविकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी देव आपल्यातच होते. डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा, असे ‌आवाहन करून हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिस्त पाळल्याबद्दल नागरिकांचे कौतुक

दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतर धर्मीयांनीही ईद, माउंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे कौतुक केले.

मंदिरे उघडण्यावरून रंगले हाेते राजकारण

लाॅकडाऊन काळात मंदिरे उघडण्यावरूनही राजकारण रंगले होते. मद्यालये, हॉटेल्स उघडण्यास परवानगी देण्याच्या निर्णयावर टीकेचा भडिमार करून भाजपने राज्यभरात आंदोलने केली. वंचित बहुजन आघाडीनेही अॅड.प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथे आंदोलन करून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.त्याचप्रमाणे एमआयएमनेही धार्मिक स्थळे उघडण्याची वारंवार मागणी केली होती.

मंदिरांवरून उडाला होता राज्यपाल-मुख्यमंत्र्यांत वादाचा धुरळा

मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून वादाचे मोहोळ उठवले होते. मंदिरे बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का की ज्या सेक्युलर शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो सेक्युलर शब्द तुम्ही स्वीकारला आहे, अशी खोचक विचारणा राज्यपालांनी केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पदाची शपथ घेतानाची आठवण करून देत माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे उत्तर दिले होते.

उशिरा सुचलेले शहाणपण : दरेकर

मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केले. मात्र हे आघाडी सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण अाहे, असा टोलाही लगावला.

बातम्या आणखी आहेत...