आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेमडेसिवीर:50 हजार ‘रेमडेसिवीर’ भाजप देणारच; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची ग्वाही

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • थेट नागरिकांना वाटप न करता राज्य सरकारकडे सोपवणार

महाराष्ट्र प्रदेश भाजपने ५० हजार रेमडेसिविर कुप्या राज्यातील जनतेला देण्याचे वचन दिले होते. त्यावर भाजप ठाम असून रेमडेसिविर कुप्या आम्ही जनतेला थेट न वाटता ते राज्य सरकारला सुपूर्द करणार आहोत, अशी ग्वाही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी ‘दिव्य मराठी’ला दिली. दरेकर म्हणाले की, मी व भाजप आमदार प्रसाद लाड आम्ही दोघांनी दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीला १२ एप्रिल रोजी भेट दिली होती. कंपनीकडे रेमडेसिविरचा साठा असल्याचे कंपनीने आम्हाला सांगितले. मात्र महाराष्ट्राला हा साठा देण्यासाठी राज्याच्या एफडीएची परवानगी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकासह अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची १५ एप्रिल रोजी भेट घेतली. १६ एप्रिल रोजी एफडीए आयुक्तांनी ब्रुक फार्मा कंपनीला निर्यात साठा महाराष्ट्रात विक्रीची परवानगी दिली. भाजप कंपनीच्या संपर्कात आहे. कंपनीला आणखी काही परवानग्या आवश्यक आहेत. त्या मिळाल्या की ५० हजार रेमडेसिविर आम्ही आणू, असे दरेकर यांनी सांगितले. कमिशनमुळे राज्य सरकारची रेमडेसिविर खरेदी रखडली आहे, असा आरोप दरेकर यांनी केला. भाजप देणार असलेल्या ५० हजार रेमडेसिविर कुप्यांची किंमत सुमारे ४ कोटी ७५ लाख इतकी होईल.

आम्ही रेमडेसिविर नागरिकांना वाटणार नाही. ते राज्य सरकारला देणार आहोत, असे दरेकर म्हणाले. ‘प्रयत्न केल्यास रेमडेसिविर उपलब्ध होते, हे आम्हाला उद्धव सरकारला दाखवून द्यायचे आहे. त्याचप्रमाणे राज्यातील जनतेला मदत म्हणून भाजप ५० हजार कुप्या पुरवणार आहे,’ असे दरेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खासगी व्यक्तीला उत्पादक कंपनी रेमडेसिविरची विक्री करू शकत नाही. त्यामुळे प्रदेश भाजप ५० हजार रेमडेसिविर कुठून देणार, हे मला माहिती नाही. तसेच ब्रुक फार्मा कंपनीचा रेमडेसिविरचा जो काही निर्यात साठा असेल तो मुंबईत नसून तो दमण येथे कंपनीच्या गोदामात असावा. दमण केंद्रशासित प्रदेश आहे. तेथे राज्य कारवाई करू शकत नाही, असे मंत्री शिंगणे यांनी स्पष्ट केले.

इकडे डाॅ. राजेंद्र शिंगणे म्हणतात, २५ पासून पुरवठा होईल सुरळीत
२५ एप्रिलपासून राज्याला रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत होईल. मुख्यमंत्री स्वत: रेमडेसिविर उत्पादक असलेल्या सात कंपन्यांच्या व्यवस्थापकांना मंगळवारी बोलले आहेत. या कंपन्यांची दुसरी बॅच येत आहे. राज्याला दैनंदिन ५० हजार रेमडेसिविर कुप्यांची आवश्यकता आहे. मात्र लवकरच दैनंदिन ६५ हजार कुप्यांचा राज्याला पुरवठा होईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...